नियुक्तीच्या विलंबाने राजकीय चर्चांना उधाण
Washim: जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नसल्याने पक्षांतर्गत राजकीय चर्चांना वेग आला आहे. जिल्ह्यातील कार्यकारिण्या बरखास्त होऊन दोन महिने उलटले असतानाही नव्या जिल्हाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या शिंदेसेनेची जिल्ह्यातील संघटनात्मक वाटचाल नव्या कार्यकारिणीविनाच सुरू आहे.
जिल्हाप्रमुखपदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असली तरी अंतिम निर्णय कोणाच्या नावावर होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. स्वपक्षातील सक्रिय शिवसैनिकाला जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार की अन्य पक्षातून एखाद्या प्रभावी नेत्याला शिंदेसेनेत आणून त्याच्याकडे संघटनेची धुरा सोपविली जाणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
शिंदे गटातील संघटनात्मक नियुक्त्यांना होणारा विलंब हा केवळ पदनियुक्तीचा विषय नसून त्यामागे स्थानिक राजकीय समीकरणे असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. नव्या कार्यकारिणीतून जिल्ह्यातील पक्षाची सूत्रे नेमकी कोणत्या नेतृत्वाच्या प्रभावाखाली राहणार, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे. आमदार बच्चू कडू आणि भावना गवळी यांच्या प्रभावाचा संदर्भ या चर्चेत घेतला जात आहे. मात्र, पक्षाकडून याबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
राज्यात शिंदे गटाच्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये कार्यकारिण्या बरखास्त करून नव्या नियुक्त्यांची प्रक्रिया राबविल्याची उदाहरणे आहेत. अकोला जिल्ह्यातही कार्यकारिणी बरखास्तीनंतर जुन्या पदाधिकाऱ्यांना प्रभारी जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या; मात्र त्या नियुक्त्यांनाही नंतर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे नव्या कार्यकारिणीच्या नियुक्त्यांमध्ये स्थानिक समीकरणे आणि पक्षांतर्गत समन्वयाला महत्त्व दिले जात असल्याचे चित्र दिसते.
दरम्यान, जिल्हाप्रमुखपदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही प्रतीक्षेची उत्सुकता वाढली आहे. अनेक जण वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून आपापल्या पातळीवर संघटनात्मक तयारी करत आहेत. मात्र, अधिकृत घोषणा होत नसल्याने कोणाला संधी मिळणार, याबाबत संभ्रम कायम आहे.
दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांचा आक्रोश अन् मुनगंटीवारांचा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
नव्या कार्यकारिणीची घोषणा लांबण्यामागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, याची चर्चा आता शिंदेसेनेच्या गोटात रंगली आहे. जिल्हाप्रमुखाची नियुक्ती आणि त्यानंतर जाहीर होणारी कार्यकारिणी यावरच आगामी काळात जिल्ह्यातील शिंदेसेनेची संघटनात्मक दिशा स्पष्ट होणार आहे.








