२५ जागांसाठी जोरदार मोर्चेबांधणी, काही जागांचा तिढा कायम !
Yavatmal : दीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होत असून, ही निवडणूक थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी दोन्ही आघाड्यांच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र बैठका घेत २५ जागांच्या जागावाटपावर सविस्तर चर्चा केली. बहुतांश जागांवर मित्रपक्षांमध्ये एकमत झाले असले तरी काही मतदारसंघांतील पेच अद्याप कायम आहे. त्यामुळे अंतिम क्षणी कोणता पक्ष कोणत्या जागेवर उमेदवार देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार वसंत पुरके, संजय राठोड, माजी आमदार वामनराव गावंडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील, राहुल ठाकरे, तात्या मुखे, उद्धवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, प्रवीण शिंदे, किशोर शेंडे, बाबू पाटील जैत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बाबासाहेब गाडे यांच्यासह आघाडीतील विविध पक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यशोमती ठाकूर यांच्या घरावर ड्रोनच्या घिरट्या; जीवाला धोका असल्याचा दावा
दीर्घकाळानंतर निवडणूक होत असल्याने जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, त्याआधी दोन्ही आघाड्यांकडून आपापले पॅनल मजबूत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून २१ ते २२ जागा लढविण्याची तयारी असून मित्रपक्षांना तीन ते चार जागा देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांनी दिली. यवतमाळ तालुका गट आणि महिला राखीव गटातील जागांवर अद्याप पूर्णपणे समझोता झालेला नाही. या जागांवर एकमत न झाल्यास मित्रपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक धामणगाव मार्गावरील एका हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख, मंत्री इंद्रनील नाईक, माजी आमदार मदन येरावार, वसंतराव घुईखेडकर, प्रवीण देशमुख यांच्यासह नितीन भुतडा, विजय जाधव, पराग पिंगळे, हरिहर लिंगणवार, राजुदास जाधव, श्रीधर मोहोड, यशवंत पवार आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
सोमवारी रात्री झालेल्या बैठकीतील चर्चेचा धागा मंगळवारच्या बैठकीतही कायम राहिला. महागाव तालुका गटातील जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, उर्वरित बहुतांश जागांवरील तिढा सुटला असून उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महायुतीतील उमेदवारांची अधिकृत यादी बुधवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लसिंह चव्हाण यांनी दिली. महायुतीतील संभाव्य जागावाटपाची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आली असून, मान्यता मिळाल्यानंतर महायुतीचे अधिकृत पॅनल जाहीर करण्यात येणार आहे.
संभाव्य जागावाटपानुसार महायुतीत शिंदेसेनेला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असून, शिंदेसेना सुमारे १० जागांवर निवडणूक लढवू शकते. भाजपच्या वाट्याला ७ ते ८, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ६ ते ७ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘माझ्या मतदारसंघात ५० हजार बोगस मतदार’; संजय गायकवाडांचा खळबळजनक दावा
दरम्यान, जिल्हा गटातील चार जागा आणि दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पात्रतेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकेवरील निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
सध्या दोन्ही आघाड्यांतील मित्रपक्षांमध्ये काही जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच आणि न्यायालयीन निर्णय या दोन्ही बाबी निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीची लढत किती रंगतदार होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








