बुलढाणा मतदारसंघात एसआयआरमुळे ७१ हजार नावे कमी झाल्याची माहिती
Buldhana मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणावरून (एसआयआर) विरोधकांकडून निवडणूक आयोगावर आरोप होत असतानाच, शिवसेना (शिंदे गट)चे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले आहे. आपल्या मतदारसंघात पूर्वी सुमारे ५० हजार बोगस मतदार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच एसआयआर प्रक्रियेमुळे बुलढाणा मतदारसंघातील तब्बल ७१ हजार संशयास्पद आणि बोगस मतदारांची नावे कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधताना गायकवाड यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले. “ज्ञानेश कुमार करीत असलेले काम १०० टक्के योग्य असून, आता खरी आणि पारदर्शक मतदार यादी तयार होत आहे,” असे ते म्हणाले.
‘सत्ताधारी असूनही मतचोरीवर बोललो’
एसआयआरवरून विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की, निवडणुका आल्या की विरोधक भाजप आणि मित्रपक्ष बोगस मतांच्या जोरावर निवडून येत असल्याचा आरोप करतात. मात्र, एसआयआर सुरू होण्यापूर्वीच आपण आपल्या मतदारसंघात सुमारे ५० हजार बोगस मतदार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते, असा दावा त्यांनी केला.
अनेक मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंदवली गेली होती. प्राथमिक तपासणीत ३ लाख २३ हजार मतदारांपैकी २३ हजार मतदार बोगस आढळल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. “बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करीत असल्याने माझ्या मतदारसंघातील तब्बल ७१ हजार बोगस मते वगळली गेली आहेत,” असा दावा त्यांनी केला.
‘दोन्ही शिवसेना एकत्र येणे शक्य नाही’
दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेबाबत गायकवाड म्हणाले की, कार्यकर्त्यांना दोन्ही राष्ट्रवादी किंवा दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, असे वाटत असले तरी सध्याच्या परिस्थितीत दोन्ही शिवसेना एकत्र येणे राजकीयदृष्ट्या शक्य नाही.
दुष्काळावरून शरद पवारांवर निशाणा
दुष्काळाच्या मुद्द्यावरूनही गायकवाड यांनी विरोधकांवर टीका केली. “शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी दुष्काळ जाहीर झाल्याबरोबर शेतकऱ्यांना रोख पैसे वाटले होते का?” असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली असून, सरकारने २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याचे ते म्हणाले.
नितेश कराळे गुरुजींच्या उमेदवारीने पदवीधर मतदारसंघात नवे समीकरण
रोहित पवारांवरही टीका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष)चे आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवरही गायकवाड यांनी टीका केली. “रोहित पवारांना प्रत्येक गोष्टीत संशय घेण्याची सवय झाली आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आयएएस किंवा आयपीएसची परीक्षा द्यावी आणि प्रत्येक प्रकरणाची चौकशी करावी,” असा टोला त्यांनी लगावला.








