शेतकऱ्यांना भडकावून दिशाभूल करीत असल्याची टीका
Nagpur राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीवरून महायुती सरकारला सातत्याने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
रोहित पवारांना बिनबुडाची विधाने करून केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा हव्यास जडला असून, ते विनाकारण शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल करत आहेत, असा घणाघाती आरोप बावनकुळे यांनी केला. आम्ही दिवाळी साजरी करणार नाही, तुम्हाला करायची असेल तर माझ्या घरी या असे निमंत्रणही बावनकुळे यांनी त्यांना दिले.
आदिवासी विद्यार्थी, शेतकरी आणि एमपीएससी परीक्षेच्या आंदोलनांत उडी घेतलेले रोहित पवार रोज सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. नुकताच त्यांनी, दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहता मंत्र्यांना दिवाळी साजरी करू दिली जाणार नाही, महामार्ग रोखून धरू, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच भडकले.
पवारांना सडेतोड उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, इथे कोण दिवाळी साजरी करायला निघाला आहे? आणि तुम्हाला दिवाळी साजरी करायचीच असेल, तर माझ्या घरी या, हेच माझे निमंत्रण समजा. या मंत्र्याचे हे करू, त्या मंत्र्याचे ते करू अशा धमक्या देणे राजकारणात योग्य नसून, रोहित पवारांनी स्टंटबाजी सोडून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्य सरकार दुष्काळाबाबत अत्यंत संवेदनशील असून युद्धपातळीवर उपाययोजना राबवत असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, मागणीनुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत वाढ करण्यात आली आहे. रस्त्यांचा निधी कट करून जिल्हा नियोजन समितीमार्फत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.
भाजपमध्ये एन्ट्रीची चर्चा, काँग्रेसने आधीच जाहीर केला उमेदवार
सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवून त्यांची दिवाळी बिकट होणार नाही, याची पूर्ण काळजी सरकार घेत आहे. तसेच दुष्काळामुळे लग्नसोहळे साधेपणाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लोकप्रतिनिधींनी आपले वाढदिवसही रद्द केले आहेत. कुठल्याही मंत्र्याला फटाके फोडून किंवा घरावर रोषणाई करून साजरी करण्याचा विचार नाही, असे सांगत बावनकुळे यांनी रोहित पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले.








