व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अनिल सोले बंडाच्या तयारीत; सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज

अनिल सोले बंडाच्या तयारीत; सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज

सलग दुसऱ्यांदा तिकीट कापल्याने धोका झाल्याची भावना

नागपूर: नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे नाव जाहीर होताच पक्षात मोठे राजकीय वादळ उठले आहे. पक्षाच्या निर्णयाला उघड आव्हान देत माजी आमदार व माजी महापौर अनिल सोले यांनी बंडाचे निशान फडकवले असून उद्या सोमवारी दुपारी १:३० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. कालपर्यंत पक्षात बंडखोरांची समजूत काढणारे सोलेच आता बंडाच्या पवित्र्यात आल्याने भाजप नेत्यांचे टेन्शन प्रचंड वाढले आहे.

यापूर्वी नितीन गडकरी यांनी पदवीधर मतदारसंघाची धुरा सोपवल्यानंतर अनिल सोले यांनी भाजपचा हा पारंपरिक बालेकिल्ला मजबूत ठेवला होता. मात्र, ६ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती, ज्याचा फटका भाजपला पराभवाच्या रूपाने बसला. यावेळी पक्ष आपली चूक सुधारेल आणि सोले यांनाच पुन्हा संधी देईल अशी अपेक्षा असताना पक्षाने सुधाकर कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामुळे नाराज झालेल्या सोले यांनी आपण निवडणूक लढणारच असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपमधील तब्बल ६० टक्के आजी-माजी नेत्यांचा सोले यांना पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे.

फडणविसांच्या मनाप्रमाणेच झाले, भाजपकडून सुधाकर कोहळे यांच्या नावावर मोहर

गेल्या वर्षभरापासून भाजपमध्ये सुधाकर कोहळे यांच्या नावाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. त्याला उत्तर म्हणून अनिल सोले यांनीही प्रचाराचा धडाका लावत समर्थकांच्या माध्यमातून जोरदार वातावरणनिर्मिती केली होती. मात्र, उमेदवारी नाकारल्याने सोले शांत न बसता पक्षाविरोधात थेट मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता या बंडखोरीचा फटका भाजपला पुन्हा एकदा बसणार का, आणि सोले यांची समजूत काढण्यात वरिष्ठ नेत्यांना यश येणार की बंडखोरी कायम राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

error: Content is protected !!