सर्वपक्षीय कृती समितीच्या मागणीला पुन्हा बळ; स्वतंत्र कार्यालयासाठी संघर्षाची शक्यता
Gadchiroli : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे आता आष्टी परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागाने २२ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असला, तरी अपर तहसीलदार कार्यालय घोटऐवजी आष्टी येथेच सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, आष्टीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या सहभागातून कृती समिती स्थापन करण्यात आली होती. शासनाकडूनही याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आल्याने आता घोटच्या निर्णयामुळे आष्टीच्या तालुका निर्मितीच्या मागणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चामोर्शी तहसील कार्यालयांतर्गत सध्या चामोर्शी, कुनघाडा, भेंडाळा, येनापूर, आष्टी आणि घोट या महसूल मंडळांचा समावेश आहे. महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने घोट येथे अपर तहसीलदार कार्यालयास मंजुरी देण्यात आली आहे. नव्या प्रशासकीय रचनेनुसार चामोर्शी तहसील कार्यालयांतर्गत चार महसूल मंडळे, तर घोट येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालयांतर्गत आष्टी आणि घोट या दोन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
आष्टी परिसरातील नागरिकांचा आक्षेप केवळ अपर तहसील कार्यालयाच्या ठिकाणापुरता मर्यादित नाही. आष्टीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली होती. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाकडूनही आष्टीच्या मागणीबाबत आश्वासन मिळाल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत अपर तहसील कार्यालय घोट येथे मंजूर झाल्याने आष्टीच्या स्वतंत्र प्रशासकीय अस्तित्वाच्या मागणीला दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.
शासन निर्णयानुसार घोट येथे सुरुवातीला तात्पुरत्या जागेत कार्यालय सुरू करण्याची व्यवस्था करावी, त्यानंतर कायमस्वरूपी जागा निश्चित करून नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदस्थापना आणि आवश्यक प्रशासकीय पूर्तता करून १५ दिवसांत अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या वादावर प्रतिक्रिया देताना गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले की, सुरुवातीला घोट येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता आणि त्याला मंजुरी मिळाली आहे. मात्र, आष्टीकरांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. आष्टीसाठीही स्वतंत्र अपर तहसील कार्यालय मंजूर व्हावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी प्राथमिक चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षांतराच्या संशयातून राजीनामा देणाऱ्या आमदार – खासदारांना बसणार लगाम?
आता आष्टीसाठी स्वतंत्र कार्यालयाचा प्रस्ताव प्रत्यक्षात किती वेगाने पुढे जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या तालुका निर्मितीच्या मागणीचे पुढे काय होणार, तसेच शासन आपल्या आश्वासनाची पूर्तता करणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. घोटच्या निर्णयानंतर आष्टीतील राजकीय पक्ष आणि स्थानिक नेतृत्व पुन्हा एकत्र येऊन आंदोलनाची भूमिका घेतात का, याकडेही परिसराचे लक्ष लागले आहे.








