मध्यस्थीचे पाऊल, नागपुरात ‘कमळा’तील बंडखोरी शमणार?
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासह राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांची उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये असंतोषाचा मोठा उद्रेक झाला आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्याविरोधात माजी आमदार अनिल सोले आणि निष्ठावंत स्वयंसेवक रमण सेनाड यांनी बंडाचे निशाण उभारले आहे, तर भंडाऱ्यातून आल्हाद भांडारकर यांनीही दावेदारी ठोकली आहे.
वाढत्या बंडखोरीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप केला असून नाराजी असेल तर दूर करू, बंडखोरांशी मी स्वतः चर्चा करेन, त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, असे जाहीर आवाहन केले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानला जायचा. मुख्यमंत्री फडणवीस यांचे वडील कै. गंगाधरराव फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजीमुळे भाजपला हा हक्काचा गड गमवावा लागला होता. तीच चूक पुन्हा घडल्यास पक्षाला मोठा फटका बसेल, हे ओळखून मुख्यमंत्र्यांनी स्वतः मध्यस्थीचे पाऊल उचलले आहे.
दक्षिण नागपूरचे माजी आमदार, शहराध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त, ग्रामीण भाजपचे अध्यक्ष आणि अलीकडेच पश्चिम नागपुरातून उमेदवारी मिळवलेले सुधाकर कोहळे यांनाच पुन्हा संधी दिल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांत तीव्र संताप आहे. प्रत्येक महत्त्वाच्या जागेवर कोहळेच का असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे, माजी महापौर अनिल सोले यांचे तिकीट गेल्या वेळी डावलल्यामुळेच भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोले यांच्या ऊर्जा बचतीच्या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले होते, तरीही पक्षाने त्यांना डावलल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच, गेली अनेक वर्षे निष्ठेने काम करणारे स्वयंसेवक रमण सेनाड यांना नेहमी डावलले जात असल्याने आम्ही फक्त घाम गाळायचा आणि पक्षाने बाहेरच्यांना महत्त्व द्यायचे का?” असा रोखठोक सवाल सेनाड समर्थकांनी केला आहे.
‘कमळा’ची परीक्षा, भाजपचे कोहळे, सोले अन् सेनाड एकाच दिवशी अर्ज भरणार
तिन्ही दावेदार एकाच दिवशी अर्ज भरण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हे बंडखोर माघार घेतात की बंडाचे निशाण कायम ठेवतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








