व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या भोयर, शिंदे-बोंडे यांच्यासह तिघांचे भाजपमधून निलंबन; आमदार-खासदारही रडारवर!

भोयर, शिंदे-बोंडे यांच्यासह तिघांचे भाजपमधून निलंबन; आमदार-खासदारही रडारवर!

किरण सरनाईक यांच्याविरोधात बंडखोरी भोवली; नितीन गुडधे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस

Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भारतीय जनता पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तथा भाजपचे सहसंयोजक चंद्रशेखर भोयर, शिक्षक संघर्ष समितीच्या अध्यक्ष तथा भाजपच्या संयोजक संगीता शिंदे-बोंडे आणि भाजपचे जिल्हा सचिव सुमित पवार या तिघांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसड यांनी ही कारवाई केली. दरम्यान, बंडखोरांच्या प्रचारात सहभागी होणाऱ्या आमदार आणि खासदारांवरही कारवाई होऊ शकते, असा इशारा अडसड यांनी दिल्याने पक्षांतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

बंडखोरांच्या प्रचारावरून कारवाई

प्रदेश भाजपाने निवडणूक रणनीतीचा अनुभवी चेहरा उतरवला मैदानात; नागपूर पदवीधर निवडणुकीच्या महायुती समन्वयाची जबाबदारी मुनगंटीवारांकडे!

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने किरण सरनाईक यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, या निर्णयाला आव्हान देत काही नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे महायुतीसमोरच नव्हे, तर भाजपसमोरही पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर पक्षाची अधिकृत भूमिका डावलून बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे-बोंडे आणि सुमित पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्यांना पक्षात थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

नितीन गुडधे पाटील यांना नोटीस

बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाल्याच्या आरोपावरून भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन गुडधे पाटील यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

केवळ जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांपुरतीच ही कारवाई मर्यादित राहणार नसल्याचे संकेतही पक्षाने दिले आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या विरोधात भूमिका घेणारे किंवा बंडखोर उमेदवारांचा प्रचार करणारे भाजपचे आमदार अथवा खासदार ठोस पुराव्यांसह आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाईचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे आमदार प्रताप अडसड यांनी स्पष्ट केले.

एक वर्ष शांतता भंग करायची नाही, कोर्टाने दिली अभिजित दिपकेंना तंबी

कार्यकर्त्यांनाही कारवाईचा इशारा

बंडखोर उमेदवारांच्या प्रचारात किंवा त्यांच्या रॅलीत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा अडसड यांनी दिला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीची अधिकृत भूमिका कायम ठेवण्यासाठी भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणि महायुतीतील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंडखोरी रोखण्यात पक्षाला कितपत यश मिळते आणि या कारवाईचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!