व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘वंचित’ला मिळाला कॅप्टन; शिंदेसेनेचा मुहूर्त गुलदस्त्यात!

‘वंचित’ला मिळाला कॅप्टन; शिंदेसेनेचा मुहूर्त गुलदस्त्यात!

राजकीय वर्तुळात चर्चा; नव्या नियुक्त्यांमुळे संघटनात्मक समीकरणांना वेग

Washim : जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जिल्हाध्यक्ष नसल्याने गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, वंचित बहुजन आघाडीने पूर्व आणि पश्चिम असे दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नियुक्त करून संघटनात्मक पातळीवर पुढचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे वंचितच्या नियुक्त्यांबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला, तरी शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा मुहूर्त कधी निघणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी दोन भागांत विभागून नेतृत्वाची नियुक्ती केल्याने पक्षाच्या कामकाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे आणि आगामी राजकीय घडामोडींसाठी तयारी करणे, या दृष्टीने या नियुक्त्यांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता राजकीय चर्चांचा रोख शिंदेसेनेकडे वळला आहे.

शिंदेसेनेत मात्र जिल्हाप्रमुखपदाचा निर्णय अद्याप झालेला नसल्याने उत्सुकता कायम आहे. पक्षात नव्या नेत्यांचे आगमन आणि वाढत्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपवायची, हा महत्त्वाचा प्रश्न ठरत असल्याची चर्चा आहे. खासदार संजय देशमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या पक्षातील सहभागामुळे नेतृत्वनिवडीचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाल्याचे बोलले जात आहे.

देवीच्या दरबारात कृष्णाभाऊंचे साकडे!

जिल्हाप्रमुखपदाच्या निवडीची सूत्रे आमदार भावना गवळी यांच्याकडे सोपविली जाणार की खासदार संजय देशमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्या सल्लामसलतीनंतर नाव निश्चित होणार, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, या निवडीबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नसल्याने संभाव्य नावांबाबतची चर्चा अद्याप अंदाजांच्या पातळीवरच आहे.

कार्यकर्ते सक्रिय, नेते एकत्र; मात्र सत्ता प्राप्तीचे गणित धुसरच !

दरम्यान, पक्षात नेत्यांची संख्या वाढत असताना संघटनात्मक जबाबदारी निश्चित होण्यास विलंब का होत आहे, असा प्रश्नही कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत असल्याची चर्चा आहे. पक्षाचा विस्तार, नेत्यांमधील समन्वय आणि स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हाप्रमुखाची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते.

एकीकडे वंचित बहुजन आघाडीने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करून संघटनात्मक पातळीवर हालचाल केली, तर दुसरीकडे शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा निर्णय अद्याप प्रतीक्षेत आहे. त्यामुळे राजकीय कट्ट्यावर आता एकच प्रश्न चर्चेत आहे ‘वंचित’ला संघटनेचा कॅप्टन मिळाला; मग शिंदेसेनेच्या जिल्ह्याची धुरा सांभाळणारा कॅप्टन नेमका कधी ठरणार?

__

 

error: Content is protected !!