व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण पक्ष फोडणाऱ्यांना आता स्वतःचे खासदार सांभाळावे लागतील; वासनिकांचा हल्ला

पक्ष फोडणाऱ्यांना आता स्वतःचे खासदार सांभाळावे लागतील; वासनिकांचा हल्ला

निवडणूक आयोगाच्या कारभारावरही निशाणा; शेतकरी प्रश्नासाठी आंदोलनाचा इशारा

Buldhana देशातील राजकीय परिस्थिती बदलत असून, सत्ताधारी पक्षातील खासदार आणि मंत्र्यांमध्येही भविष्यातील राजकीय घडामोडींविषयी चर्चा सुरू असल्याचा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी केला. आतापर्यंत इतर राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना आता स्वतःचे खासदार टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागेल, असे सूचक विधान करत त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले.

दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा करण्याची मागणी केली. मदत न मिळाल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना वासनिक यांनी केंद्र सरकारमधील संभाव्य अस्वस्थतेकडे लक्ष वेधले. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त यांच्या भूमिकांमध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. अशाच प्रकारची परिस्थिती केंद्र सरकारमध्येही निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

प्रत्येक पदाधिकाऱ्याला पाच मतांची जबाबदारी; भाजपाची मोर्चेबांधणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार यांच्यात भविष्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा सुरू असल्याचा दावाही वासनिक यांनी केला. आगामी काळात राजकीय समीकरणे कशी बदलतील, याबाबत सत्ताधारी गोटातही विचारमंथन सुरू असल्याचे ते म्हणाले.

विविध राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना आता स्वतःच्या पक्षातील खासदारांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. राजकीय परिस्थिती नेहमी एकसारखी राहत नाही. त्यामुळे आगामी काळात कोणती समीकरणे बदलतात, हे पाहावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारवर टीका करताना वासनिक यांनी विरोधकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. देशातील लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत लोकशाही व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले. लोकशाही संस्था कमकुवत झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

महापालिकेला विश्वासात न घेताच उत्पन्नाचे सर्वेक्षण?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत वासनिक यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली. निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भातील प्रश्नांवर काँग्रेस माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आणि लोकशाही संस्थांचे स्वातंत्र्य हा केवळ काँग्रेसपुरता मर्यादित विषय नसून, तो व्यापक जनतेशी संबंधित असल्याचे वासनिक म्हणाले. आगामी आंदोलनाची रणनीती आताच उघड करता येणार नसल्याचे सांगत त्यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत सूचक विधानही केले.

सहा जिल्ह्यांचा प्रचार, रात्रीचा प्रवास अन् थेट रुग्णालयात… कराळे मास्तरांची पोस्ट चर्चेत!

दसऱ्यापूर्वी मदत द्या; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे झालेले नुकसान याकडे वासनिक यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही अद्याप पुरेशी मदत मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांना एका बाजूला पावसाच्या लहरीपणाचा फटका बसत असताना दुसरीकडे नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात दसऱ्यापूर्वी मदतीची रक्कम जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणे आवश्यक आहे. सरकारने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास काँग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही वासनिक यांनी दिला.

 

error: Content is protected !!