व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण सहा जिल्ह्यांचा प्रचार, रात्रीचा प्रवास अन् थेट रुग्णालयात… कराळे मास्तरांची पोस्ट चर्चेत!

सहा जिल्ह्यांचा प्रचार, रात्रीचा प्रवास अन् थेट रुग्णालयात… कराळे मास्तरांची पोस्ट चर्चेत!

पदवीधरच्या धावपळीत सलाईन लावलेला फोटो शेअर करत मांडली कहाणी

Wardha : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरून निर्माण झालेली बंडखोरी आणि उमेदवारांच्या प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच अपक्ष उमेदवार निलेश कराळे मास्तर यांच्या एका समाजमाध्यमावरील पोस्टने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. सहा जिल्ह्यांतील प्रचाराचा ताण, सततचा प्रवास, अपुरी झोप आणि बिघडलेली प्रकृती यांचा उल्लेख करत त्यांनी सलाईन लावलेला स्वतःचा फोटो शेअर केला. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत कराळे मास्तरांच्या प्रकृतीची आणि त्यांच्या प्रचाराच्या धावपळीची चर्चा सुरू झाली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होण्याच्या पार्श्वभूमीवर निलेश कराळे मास्तर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसऱ्यांदा अर्ज भरून त्यांनी प्रचाराला वेगळी दिशा दिल्याचे दिसत आहे. पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गावोगावी दौरे, सभा आणि संवादावर त्यांनी भर दिला आहे. आपल्या खास वऱ्हाडी भाषाशैलीमुळे परिचित असलेले कराळे मास्तर प्रचारादरम्यान सरकारवर टीका करत पदवीधरांचे प्रश्न आणि विविध सार्वजनिक मुद्दे मांडत आहेत.

अनिल सोले यांच्या बंडखोरीने मुख्यमंत्री अस्वस्थ; पूर्व विदर्भातील आमदारांची आपत्कालीन बैठक बोलावली

मात्र, प्रचाराचा हा झंझावात सुरू असतानाच त्यांच्या प्रकृतीबाबतची पोस्ट समोर आली. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी अवघ्या काही दिवसांत सहा जिल्ह्यांत फिरावे लागत असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. दररोज सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रात्री उशिरा, कधी पहाटे तीन ते चार वाजता घरी परतण्यापर्यंतचा प्रवास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अपुरी झोप, जेवणाच्या अनियमित वेळा आणि कधी उपाशीपोटी करावा लागणारा प्रवास यामुळे शरीरावर ताण पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याच धावपळीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी पुणे गाठले. रात्रभर विद्यार्थ्यांसोबत राहून पहाटे परतल्यानंतर लगेचच मतदारसंघातील प्रचाराला सुरुवात केल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

या सततच्या धावपळीचा परिणाम झाल्याचे सांगताना कराळे मास्तरांनी अचानक उलट्या सुरू झाल्यामुळे प्रकृती खालावल्याचे आणि रुग्णालयात दाखल होऊन सलाईन लावावे लागल्याचे नमूद केले. वर्ध्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, प्रकृती बिघडलेली असतानाही प्रचारासाठी चार ते पाच जिल्हे बाकी असून हातात केवळ दहा दिवस असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

‘वंचित’ला मिळाला कॅप्टन; शिंदेसेनेचा मुहूर्त गुलदस्त्यात!

प्रकृतीच्या त्रासानंतरही पदवीधरांच्या प्रश्नांसाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी सुरू केलेला संघर्ष थांबलेला नाही, अशी भूमिका कराळे मास्तरांनी मांडली. वेळ कमी, जबाबदारी मोठी आणि संघर्ष कठीण असल्याचे सांगत त्यांनी ‘लढेंगे और जीतेंगे!’ तसेच ‘इंकलाब जिंदाबाद!’ या घोषणांमधून आपला निर्धार व्यक्त केला.

निवडणुकीतील उमेदवारीची चुरस, बंडखोरी आणि प्रचारातील आरोप-प्रत्यारोप यांदरम्यान कराळे मास्तरांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या समर्थकांकडून या धावपळीची चर्चा होत असतानाच, उर्वरित प्रचारात ते कशा पद्धतीने सहभागी होणार, याकडेही लक्ष लागले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबतची पुढील अधिकृत माहिती समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

_____

 

error: Content is protected !!