व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देता, आम्हाला भिकारी समजता का?, तुपकर संतापले

शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देता, आम्हाला भिकारी समजता का?, तुपकर संतापले

हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

Buldhana राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असून, सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारने मागणी मान्य न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा तुपकर यांनी दिला.

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यांत दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. मात्र, या मदतीवर तुपकर यांनी आक्षेप घेत सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मतचोरीच्या आरोपांत अमित झनकांचा संदर्भ

‘आम्ही देशाचे अन्नदाते, भिकारी नाही!’

रविकांत तुपकर म्हणाले, “दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा करणार असल्याचे सरकार सांगत आहे. ही निव्वळ शेतकऱ्यांची थट्टा असून, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. पाच हजार रुपये देऊन तुम्ही आम्हाला भिकारी समजता का? आम्ही देशाचे अन्नदाते आहोत. आम्ही पेरणी केली नाही, तर तुम्ही काय खाणार? सरकारने हे लक्षात ठेवावे की, देशातील जनता शेतकऱ्यांच्या भरवशावर आहे. पाच हजार रुपयांत काय होणार आहे?”

हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या

शेतीसाठी हेक्टरी सुमारे एक लाख रुपये खर्च येत असल्याचा दावा करत तुपकर यांनी नुकसानभरपाईची रक्कम वाढविण्याची मागणी केली. नुकसानभरपाईसाठी हेक्टरची मर्यादा न ठेवता शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, असे ते म्हणाले.

“सरकारला आमचे आव्हान आहे. पाच हजार रुपयांत वर्षभराचा खर्च भागवून दाखवा. सरकारने आमच्याकडे येऊन राहावे आणि याच रकमेत दिवाळी साजरी करून दाखवावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असे थोतांड बंद करा,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

मुनगंटीवारांचा पुढाकार अन् बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरी आले दुष्काळग्रस्तांच्या यादीत

आंदोलन छेडण्याचा इशारा

शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला त्यांची जागा दाखवून देतील, असा इशाराही तुपकर यांनी दिला. पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना मान्य नसून, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात सरकारविरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला.

error: Content is protected !!