पक्षातील नाराजी संपलेली नाही, संघातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी आमदार अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला, तरी भारतीय जनता पक्षाची चिंतेची ढग अजूनही हटलेली नाहीत. पक्षांतर्गत रोष आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची नाराजी कायम असल्याने, भाजपने कोणतीही रिस्क न घेता अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दार ठोठावले आहे. बुधवारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संघ मुख्यालयात जाऊन वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा केली.
भाजपने या मतदारसंघासाठी माजी आमदार सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, संसदीय मंडळाची बैठक न घेता, विशिष्ट नेत्यांनी दबाव आणून ही उमेदवारी लादल्याचा गंभीर आरोप करत माजी आमदार अनिल सोले यांनी बंड पुकारले होते. सोले यांच्या समर्थनात जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष पं. बच्छराज व्यास यांचे कुटुंबीय माजी आमदार गिरीश व्यास यांनीही पदांचे राजीनामे दिल्याने थेट दिल्ली दरबारात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोले यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली. आमची चूक झाली, अशी कबुली देत वरिष्ठ नेत्यांनी सोले यांचे सर्व आक्षेप मान्य केले व त्यांची माघार घेण्यास राजी केले. परंतु, सोले मागे हटले तरी सामान्य कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस अजूनही कायम आहे. मागील पदवीधर निवडणुकीत लागलेल्या धक्क्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने संघाचे नेटवर्क सक्रिय करण्याची विनंती केली आहे.
सोले यांच्या माघारीचा सर्वाधिक फायदा कोणाला?; नाना पटोले यांचा दावा
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या फटक्यानंतर, विधानसभा निवडणुकीत संघाने पूर्ण ताकदीने मैदानात उतरून भाजपला दणदणीत विजय मिळवून दिला होता. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनीही संघाच्या स्वयंसेवकांनी घरोघरी केलेल्या कामामुळेच निवडणुकीचा निकाल बदलला, अशी जाहीर कबुली दिली होती. आता तीच रणनीती नागपूर पदवीधर निवडणुकीत वापरून संघाचे मजबूत नेटवर्क मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.








