व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या सोले यांच्या माघारीचा सर्वाधिक फायदा कोणाला?; नाना पटोले यांचा दावा

सोले यांच्या माघारीचा सर्वाधिक फायदा कोणाला?; नाना पटोले यांचा दावा

काँग्रेसची आढावा बैठक, भाजपचे कार्यकर्ते नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची टीका

Nagpur नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा मार्ग सोपा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. सोले यांच्या माघारीचा फायदा भाजपला नव्हे, तर महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांनाच अधिक होणार असल्याचा ठाम दावा नाना पटोले यांनी केला आहे.

नागपूरमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपमध्ये सध्या हजारो कार्यकर्ते नाराज आहेत. वर्षांनुवर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असून, त्यांना अडगळीत टाकण्याचे काम सुरू आहे. केवळ मर्जीतील लोकांनाच संधी दिली जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे. अनिल सोले यांच्यावर अन्याय झाला म्हणूनच त्यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यांनी व्यक्त केलेली भावना ही भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांचीच आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणवाढीचा प्रश्न प्रलंबित; दसऱ्यापर्यंत अल्टिमेटम

पटोले यांनी पुढे स्पष्ट केले की, अनिल सोले यांनी माघार घेतल्याने केवळ त्यांची वैयक्तिक नाराजी दूर झाली असेल, पण त्यांच्या पाठीशी असलेले हजारो कार्यकर्ते आणि मतदार अद्याप समाधानी नाहीत. सोले यांना जी मते मिळणार होती, ती आता थेट काँग्रेसच्या पारड्यात पडणार आहेत. ग्रामीण भागातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी हीच भावना आपल्याकडे बोलून दाखवल्याचा दावाही पटोले यांनी केला.

अमरावतीच्या सहकार विभागात चाललंय तरी काय?

नागपूर शहर आणि ग्रामीण भागात भाजपविरोधात सर्वाधिक नाराजी आहे. ही निवडणूक बॅलेट पेपरवर होत असून, राहुल गांधी यासाठी सातत्याने लढा देत आहेत, असे सांगत पटोले म्हणाले, “यापूर्वी भाजपचा बालेकिल्ला असलेली ही जागा आपण अभिजित वंजारी यांच्या रूपाने महाविकास आघाडीकडे खेचून आणली आहे. पक्षातील सर्व मतभेद बाजूला ठेवून, कोणतीही गडबड न होऊ देता वंजारी यांना पहिल्याच फेरीत स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासाठी सर्वांनी पूर्ण ताकतीने कामाला लागले पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

 

error: Content is protected !!