आरमोरीच्या माजी आमदारांचा पुन्हा पक्षबदल; शिवसेनेपासून राष्ट्रवादीपर्यंत आता शिंदे गटात !
Gadchiroli: विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आरमोरीचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी राजकीय सीमोल्लंघन करत मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विविध राजकीय पक्षांमधील प्रवासानंतर मडावी यांनी पुन्हा शिवसेनेची वाट धरल्याने त्यांच्या पुढील राजकीय रणनीतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेच्या राजकीय वाटचालीला १९९० मध्ये महत्त्वाचे वळण मिळाले होते. स्व. हरिराम वरखडे यांनी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत जिल्ह्यात शिवसेनेचे खाते उघडले. मात्र, पुढे पक्षांतर्गत घडामोडींनंतर त्यांनी छगन भुजबळ यांना साथ दिली. त्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेची राजकीय जागा डॉ. रामकृष्ण मडावी यांनी भरून काढली.
पदवीधर वेतनश्रेणीचा तिढा कायम! विदर्भातील ६ हजार शिक्षक नाराज; निवडणुकीत राजकीय पक्षांची कसोटी
डॉ. मडावी यांनी १९९५ ते २००४ या कालावधीत दोन वेळा आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. शिवसेनेतील फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर राजकीय समीकरणे बदलत गेली. सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे त्यांचा राजकीय मुक्काम फार काळ टिकला नाही. आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या राजकीय प्रवासात आणखी एक नवे पर्व सुरू झाले आहे.
शिवसेनेपासून उद्धवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर मडावी पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. त्यांच्या या निर्णयामागील नेमकी राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत प्रभावी राजकीय व्यासपीठ आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुनगंटीवार म्हणाले, पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, सुधाकर कोहळेंना बहुमताने निवडून द्या !
विजयादशमीच्या आधी झालेल्या या पक्षप्रवेशाला प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, स्थानिक राजकीय समीकरणे आणि मडावी यांची भूमिका यावर या प्रवेशाचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षबदलानंतर मडावी कोणती नवी राजकीय चाल खेळतात आणि जिल्ह्यात आपले स्थान पुन्हा मजबूत करण्यासाठी कोणती रणनीती आखतात, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.








