व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र ‘देश वाचवा, संविधान वाचवा’; मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेस आक्रमक

‘देश वाचवा, संविधान वाचवा’; मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेस आक्रमक

कारंजा, मानोरा आणि मालेगावात निषेध आंदोलन, निष्पक्ष चौकशीसाठी निवेदन

 

Washim : मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसने वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा आणि मालेगाव येथे आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. ‘देश वाचवा, संविधान वाचवा’ अशा घोषणा देत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण, पात्र मतदारांची नावे यादीत कायम ठेवणे आणि मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणी केली. तिन्ही ठिकाणी रॅली, निषेध आणि निवेदनांच्या माध्यमातून पक्षाने आपली भूमिका मांडली.

कारंजा शहरात काँग्रेसच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयात पोहोचली. या वेळी ‘देश वाचवा, संविधान वाचवा’, ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवा’ आणि ‘वोट चोर, गद्दी छोड’ अशा घोषणांद्वारे निषेध नोंदविण्यात आला. रॅलीनंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करावी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा विचार करावा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

२५ वर्षांपासून प्रलंबित वेकोली बाधितांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक

२००९ च्या मतदार यादीच्या आधारे निवडणुका घेण्याची मागणीही मांडण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय देशमुख, ओबीसी जिल्हाध्यक्ष निलेश कानकिरड, मैनुद्दीन सौदागर, अमिर पठाण, प्रा. सुशील देशमुख, विजय राठोड, विलास पवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

मानोरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पंचायत समिती परिसरातील स्वातंत्र्यस्तंभापासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आणि वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना 5 हजारांची मनीऑर्डर!

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करावी, मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत आणि पुनरीक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, अशा मागण्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या. या वेळी तालुकाध्यक्ष रामनाथ राठोड, जिल्हा उपाध्यक्ष संजय भानावत, इफ्तेखार पटेल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

मालेगाव तालुक्यातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत अनेक पात्र नागरिकांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, तसेच संबंधित नागरिकांना त्यांची नावे वगळण्यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावीत, अशी मागणी करण्यात आली.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नायब तहसीलदार रंजना गोरे यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष संदीप घुगे, शहराध्यक्ष योगेश बळी, शशिकांत टणमने, बाळा सावंत, गफार शहा, असिफ शेख, श्याम बळी आणि सुरज वडदकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिजित वंजारींच्या पाठीत खंजीर; काँग्रेस नेत्याच्या कॉलेजमध्ये भाजपची बैठक

कारंजा, मानोरा आणि मालेगाव येथील आंदोलनांतून काँग्रेसने मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील कथित त्रुटी, पात्र मतदारांच्या नावांचा समावेश आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता हे मुद्दे केंद्रस्थानी आणले. पात्र मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ नये आणि तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, अशी पक्षाची मागणी आहे. मतदार यादीतील कथित अनियमिततेची चौकशी करून संबंधित प्रश्नांचे निराकरण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही मालेगावातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. जिल्ह्यातील या आंदोलनांमुळे मतदार यादी पुनरीक्षण आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दा राजकीय चर्चेत आला आहे.

____

 

error: Content is protected !!