व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्हा सज्ज; ६,९३२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्हा सज्ज; ६,९३२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रे; निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

 

Yavatmal : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत विभागातील पाच जिल्ह्यांमधील एकूण २५ हजार ८१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ६ हजार ९३२ मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण २८ उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ८१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात २५, अकोला जिल्ह्यात १२, बुलढाणा जिल्ह्यात १८, वाशिम जिल्ह्यात ८ आणि यवतमाळ जिल्ह्यात १८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

एकीकडे उत्सवाचा जल्लोष, दुसरीकडे बरखास्तीचा वार!

निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राखीव मनुष्यबळाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी पात्र असलेल्या शिक्षकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद करण्यात आली आहे. मतदानाच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपासून ते मतपेट्यांच्या वाहतुकीपर्यंत प्रत्येक टप्प्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पहिल्या पसंतीत चुरस, दुसऱ्या पसंतीत विजयाचा फैसला!

मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी, यासाठी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या परिसरात ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यास तसेच राजकीय पक्षांना प्रचारासाठी मंडप किंवा बूथ उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर जमाव, प्रचार आणि मतदारांना प्रलोभने दाखवून प्रभावित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

मतदान पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या सुरक्षितपणे अमरावती येथील लोकशाही भवनात आणण्यात येणार आहेत. तेथे उभारण्यात आलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतील स्ट्राँग रूममध्ये मतपेट्या ठेवण्यात येतील. त्यानंतर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी लोकशाही भवनात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल काय लागतो, याकडे राजकीय पक्षांसह शिक्षकवर्गाचे लक्ष लागले आहे.

 

_____

yavatmal-amravati-teacher-constituency-election-6932-voters

error: Content is protected !!