अमरावती शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी ठरणार उत्कंठावर्धक
Amravati प्रचारात कोणाची हवा आहे, यापेक्षा मतमोजणीच्या वेळी कोणाला किती मते मिळतात, हे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. येथे सर्वाधिक मते मिळविणे पुरेसे नसून, विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी घेणाऱ्या उमेदवारांनाही दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी संघर्ष करावा लागू शकतो. यंदा २६ उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रचारातील ताकद आणि प्रत्यक्ष निकाल यांमध्ये मोठी तफावत दिसू शकते.
३५,८१० मतदार; विजयाचा कोटा किती?
यंदा मतदारांची संख्या ३५ हजार ८१० आहे. सर्व मतदारांनी मतदान केले आणि सर्व मतपत्रिका वैध ठरल्या, असे गृहीत धरल्यास विजयाचा कोटा १७ हजार ९०६ असेल. हा कोटा एकूण वैध मतांच्या निम्म्यापेक्षा एक मत अधिक या सूत्रानुसार निश्चित केला जातो. प्रत्यक्षात वैध मतांची संख्या कमी-जास्त झाल्यास कोटाही बदलू शकतो.
मतमोजणीत प्रथम पहिल्या पसंतीची मते मोजली जातील. कोणत्याही उमेदवाराने विजयाचा कोटा पूर्ण केला नाही, तर सर्वांत कमी मते मिळविणारा उमेदवार बाद होईल. त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील वैध पसंतीनुसार मते उर्वरित उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातील. ही प्रक्रिया कोटा पूर्ण होईपर्यंत सुरू राहील. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांचे महत्त्व वाढणार आहे.
काँग्रेसच्या काळात ‘यशोमती’चे प्रेम, भाजपच्या काळात ‘पुतना मावशी’चे!
२०२० मध्ये २५ फेऱ्यांनंतर लागला होता निकाल
२०२० च्या निवडणुकीत ३० हजार ९१८ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी १,०८९ मते अवैध ठरल्याने २९ हजार ८२९ वैध मतांच्या आधारे विजयाचा कोटा १४ हजार ९१६ निश्चित करण्यात आला होता. मात्र, पहिल्या पसंतीत कोणत्याही उमेदवाराला हा कोटा गाठता आला नव्हता. त्यामुळे तब्बल २५ फेऱ्यांनंतर मतमोजणी पूर्ण झाली.
त्या निवडणुकीत किरण सरनाईक यांना पहिल्या पसंतीची ६,०८८ मते मिळाली होती. श्रीकांत देशपांडे यांना ५,१२२, शेखर भोयर यांना ४,८८९, संगीता शिंदे यांना २,८५७, अविनाश बोर्डे यांना २,७४७, तर डॉ. नितीन धांडे यांना २,१२७ मते मिळाली होती. या आकडेवारीवरून विजयासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची आवश्यकता स्पष्ट होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जरांगे यांनी रितसर तक्रार करावी, आम्ही चौकशीस तयार
प्रचारातील हवा की मतपत्रिकेतील पसंती?
२०२० मध्ये प्रचारात चर्चेत असलेल्या काही उमेदवारांना प्रत्यक्ष मतदानात अपेक्षित यश मिळाले नव्हते. दुसरीकडे, किरण सरनाईक यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
यंदा सरनाईक यांच्यासह शेखर भोयर, आदिती पोहरे, संगीता शिंदे, श्रीकांत देशपांडे, दिलीप कडू, दत्तात्रय लहाने, अविनाश बोर्डे आणि गजानन उल्हे पाटील यांच्यासह विविध उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोण आघाडी घेणार आणि बाद होणाऱ्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते कोणाच्या पारड्यात पडणार, यावर निकालाचे गणित अवलंबून राहील.








