व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण पदवीधर निवडणूक ‘फिक्स’, तब्बल २२ हजार बोगस मतदार

पदवीधर निवडणूक ‘फिक्स’, तब्बल २२ हजार बोगस मतदार

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा खळबळजनक आरोप

Nagpur मतदानाला अवघे चोवीस तास शिल्लक असताना नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत या निवडणुकीत भाजपकडून ‘फिक्सिंग’ करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मतदारसंघातील तब्बल २० ते २२ हजार मतदारांची नोंदणी एकाच बोगस मोबाईल नंबरवरून करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, यामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एकाच मोबाईल नंबरचा (उदा. ५४३२१५४३२१) वापर करून तब्बल २० ते २२ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. हा नंबर एआय जनरेटेड किंवा काल्पनिक असल्यासारखा असून या सिरीजचा कोणताही प्रत्यक्ष फोन नंबर अस्तित्वात नाही, त्यामुळे हा नंबर नेमका कुणाचा पत्ता लागत नाही.

वर्ध्यात पदवीधर मतदारयादीत महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत निम्म्यावर; २१,७४२ मतदार बजावणार हक्क

याशिवाय, मतदारयादीत तब्बल ८ हजार ७४४ मतदारांची नावे दुबार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगावर कडक ताशेरे ओढत लोंढे म्हणाले की, निवडणूक आयोग पूर्णपणे भाजपसाठी काम करत आहे. आम्ही याबाबत पत्रव्यवहार करून माहिती मागितली होती, मात्र अद्याप आरटीआय किंवा इतर माध्यमातून याचे उत्तर देण्यात आले नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीच्यावतीने देशभर आंदोलन सुरू आहे. नागपूर शहरात पदवीधर मतदारसंघाचे एकूण १ लाख ४५ हजार मतदार असून, ४८ विविध संघटनांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजप पूर्णपणे घाबरली आहे; म्हणूनच मुख्यमंत्र्यांना येथे दोन दिवस मुक्काम करावा लागला, असा टोला त्यांनी लगावला.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्हा सज्ज; ६,९३२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

या संपूर्ण घोळाचा मेल मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त तसेच नागपूरच्या विभागीय आयुक्तांना पाठवून अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, बोगस मतदान रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाने आपली चोख यंत्रणा सज्ज ठेवली असून, कोणी दुबार किंवा बोगस मतदान करताना आढळल्यास आमचे कार्यकर्ते कायदेशीर व कडक कारवाई करायला तयार आहेत, असा इशारा अतुल लोंढे यांनी दिला आहे. भाजपचे हे गैरप्रकार जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून निवडणुकीत त्यांना योग्य उत्तर देईल, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

 

error: Content is protected !!