व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण वर्ध्यात पदवीधर मतदारयादीत महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत निम्म्यावर; २१,७४२ मतदार बजावणार हक्क

वर्ध्यात पदवीधर मतदारयादीत महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत निम्म्यावर; २१,७४२ मतदार बजावणार हक्क

 

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ; जिल्ह्यात ४१ मतदान केंद्रांवर प्रशासन सज्ज

Wardha : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आज महिला शिक्षण, रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. उच्च शिक्षणातही अनेकदा मुलींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वर्धा जिल्ह्यातील मतदार नोंदणीचे चित्र वेगळेच दिसून येत आहे. जिल्ह्यातील एकूण २१ हजार ७४२ नोंदणीकृत पदवीधर मतदारांमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. त्यामुळे सुशिक्षित महिलांच्या मतदार नोंदणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील मतदारसंख्येनुसार १३ हजार ९९ पुरुष मतदारांची नोंद आहे, तर महिला मतदारांची संख्या ८ हजार ६४३ इतकी आहे. पुरुष आणि महिला मतदारांच्या संख्येत मोठी तफावत दिसून येते. महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाबाबत सातत्याने प्रयत्न होत असताना पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीत महिलांचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी का आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदार नोंदणीबाबतची जागरूकता, स्थलांतर, विवाहानंतर बदलणारा पत्ता किंवा अन्य तांत्रिक अडचणी यांचा यावर परिणाम असू शकतो असे सांगितले जाते.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्हा सज्ज; ६,९३२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान केंद्राधिकारी आणि मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

एकीकडे उत्सवाचा जल्लोष, दुसरीकडे बरखास्तीचा वार!

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. संपूर्ण विभागात २ लाख ५५ हजार ६०३ मतदारांची नोंद असून, त्यांच्यासाठी ४४५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. विभागात एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी तीन उमेदवार वर्धा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली.

मतदारयादीतील महिलांची संख्या आणि प्रत्यक्ष मतदानातील त्यांचा सहभाग हे दोन्ही मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील ८ हजार ६४३ महिला मतदारांपैकी किती जणी मतदानाचा हक्क बजावतात, याकडे लक्ष लागले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महिलांचा सहभाग किती राहतो, यावरून त्यांच्या राजकीय प्रक्रियेतील सहभागाचे एक चित्र समोर येणार आहे.

_____

 

error: Content is protected !!