पदवीधरमध्ये कोहळे यांना कोणी पाडले उघड होणारच, बावनकुळेंना विश्वास
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा सुमारे साडेतीन हजार मतांनी पराभव झाला. पहिल्या पसंतीच्या पहिल्या फेरीत ते सुमारे पाच हजार मतांनी आघाडीवर होते. या दरम्यानच्या मतमोजणीत सुमारे साडेआठ हजार मते त्यांची अवैध झाली आहेत. एकाच पद्धतीने त्यांच्या नावासमोर दोनचा आकडा लिहून जाणीवपूर्वक खोडसाळपणा केल्याचे दिसून येते. याची चौकशी झाली पाहिजे आणि ती होणारच आहे. सत्य कधीही लपून राहात नाही आज ना उद्या ते उघड होणारच आहे असे सांगून भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रॉस व्होटिंग करणाऱ्याला थेट इशारा दिला. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
सुधाकर कोहळे पहिल्या पसंतीच्या मतांमधूनच निवडून येतील याचे नियोजन भाजपने केले होते. त्यांनी सुमारे साठ हजार मते घेतली होती.
पहिल्या फेरीत ते प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्यापुढे होते. दुसऱ्या फेरीतही त्यांची आघाडी वाढली होती. मात्र अवैध मतांनी घात केला. अवैध ठरलेली बहुतांश मते ही कोहळे यांची होती. सहा हजार मतांच्या आघाडीत ही मतांची भर पडली असती तर कोहळे हे आरामत निवडून आले असते. या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपने मोठी यंत्रणा कामाला लावली होती.
मतदानातही मोठा उत्साह बघायला मिळाला. सुमारे 65 टक्के मतदान झाल्यानंतर भाजपच्या उत्साहात आणखीच भर पडली होती. कोहळे आरामात निवडून येणार असे दावेही केले जात होते. प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले. मताधिक्य मिळूनही अवैध मतांनी भाजपचा घात झाला. सुरुवातीला ही मतदारांची चूक असावी असे वाटत होते. मात्र एकाच पद्धतीने मते अवैध ठरल्याने भाजपची शंका बळावली. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष घातले आहे.
स्थानिक नेत्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याचा लेखोजोखा तयार केला जात आहे. यातच बावनकुळे यांच्या वक्तव्याने काही सुगावे त्यांच्या हाती लागले असल्याचे दिसून येते. आज माध्यमांसोबत बोलताना त्यांनी आज ना उद्या हे उघड होणार असल्याचे सांगितले. सत्य कधीही लपून राहात नाही. ते सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट असते. कोणी काय केले हे नक्कीच समोर येईल असाही दावा आज माध्यमांसोबत बोलताना बावनकुळे यांनी केला.
तत्पूर्वी, निवडणूक प्रभारी या नात्याने या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. सध्या नागपूर आणि पुण्यातील पराभवावर एकमेकांवर आरोप करणाऱ्यांना समज देण्याची गरज असून कोणी तोंडसुख घेण्याटचा प्रयत्न करू नये असेही त्यांनी सांगितले.








