पदवीधरमधील क्रॉस व्होटिंगच्या सूत्रधारांवर लवकरच मोठी कारवाई होणार!
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या झालेल्या धक्कादायक पराभवानंतर आता पक्षात प्रचंड खळबळ उडाली आहे. या पराभवामागे पक्षांतर्गत झालेला मोठा घातपात आणि ‘प्लॅन’ करून केलेले क्रॉस व्होटिंग कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. या गुप्त बंडखोरीचा आणि घातपाताचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपली यंत्रणा कामाला लावली होती. या चौकशीत भाजपमधीलच ५ बड्या नेत्यांची नावे समोर आली असून, हे सर्व नेते आता मुख्यमंत्र्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आले आहेत. त्यांच्यावर लवकरच मोठी कारवाई करण्याचे संकेत खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहेत.
निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने भाजप पहिल्याच फेरीत ८० हजार मतांचा टप्पा ओलांडून सुधाकर कोहळे सहज विजयी होतील, असा विश्वास होता. मात्र निकाल समोर आल्यावर भाजप नेत्यांना मोठा धक्का बसला. सुमारे साडेआठ हजार मते अवैध ठरली आणि विशेष म्हणजे, यातील तब्बल ८० टक्के मते बाद होण्याचा पॅटर्न अगदी एकसारखाच होता. कोहळे यांच्या नावासमोर जाणीवपूर्वक ‘२’ हा आकडा लिहून ती मते बाद करण्यात आली होती.
हजारो मतदार एकाच प्रकारची चूक कशी करू शकतात, यावरून हा नैसर्गिक प्रकार नसून सुनियोजित कट असल्याचा संशय बळावला. हा प्रकार अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. ही चूक नैसर्गिक नसून घातपात असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी कसून चौकशीचे आदेश दिले आणि आपली यंत्रणा कामाला लावली. यातूनच ५ सूत्रधारांची नावे समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चलबिचल सुरू झाली आहे.
सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षात तीव्र असंतोष उफाळून आला होता. माजी आमदार अनिल सोले यांनी बंडाचे निशाण फडकावत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि भेटणेही टाळले होते.त्यानंतर माजी आमदार गिरीश व्यास यांनी थेट भाजपचा राजीनामा देत अनिल सोले यांना उघड पाठिंबा जाहीर केला होता. व्यास यांच्या कार्यालयात झालेल्या सोले यांच्या बैठकीला पक्षाचे कोषाध्यक्ष, काही पदाधिकारी आणि काहींचे प्रतिनिधीही उपस्थित होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी सर्व सूत्रे स्वतः हाती घेतली. त्यांनी थेट सोले यांचे घर गाठत त्यांची मानधरणी केली आणि त्यांना माघार घेण्यास राजी केले. तसेच गिरीश व्यास यांचीही नाराजी दूर करण्यात आली. त्यानंतर हे सर्व नेते कोहळे यांच्या प्रचारात सहभागी झाले, सोले आणि व्यास यांना निवडणुकीचे सह-प्रभारी बनवण्यात आले, व्यासांनी जाहीरनामासुद्धा तयार केला. वरवर सर्व काही सुरळीत झाल्याचे दिसत असले तरी, या नेत्यांनी पडद्याआडून पक्षाशी दगाफटका करत ‘क्रॉस व्होटिंग’चे जाळे विणल्याचे आता तपासात स्पष्ट झाले आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या हाती या सर्वांची कुंडली लागल्याने, या पाच नेत्यांवर पक्षांतर्गत काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








