व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण दिवाळी अंधारात; ८२ हजार शेतकऱ्यांना भाजप सरकारने दाखविला ठेंगा!

दिवाळी अंधारात; ८२ हजार शेतकऱ्यांना भाजप सरकारने दाखविला ठेंगा!

ठाकरे शिवसेना विदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकरी आंदोलन छेडणार

Akola दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने प्रत्यक्षात हजारो शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी केला. अकोला जिल्ह्यातील तीन लाख सहा हजार पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल ८२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम जमा झाली नसल्याचा दावा त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. हिवाळी अधिवेशनानंतर विदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकरी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना सरकारने दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जिल्ह्यातील हजारो शेतकरी अद्याप या मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे देशमुख म्हणाले. पाच हजार रुपयांच्या मदतीत खासदार आणि आमदारांची दिवाळी साजरी झाली का, असा खोचक सवाल करीत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. शेतकऱ्यांना आश्वासनांच्या भूलथापा देण्यापलीकडे सरकारने काहीही केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोर्शीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस; विभागीय चौकशीचेही आदेश

चार महिन्यांत ६४ शेतकरी आत्महत्या

दुष्काळाच्या तीव्रतेमुळे मागील चार महिन्यांत अकोला जिल्ह्यात ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. राज्यात नऊ महिन्यांत २२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावाही त्यांनी केला. शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या सरकारच्या शेतकरी धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे ते म्हणाले.

सरसकट एक लाख रुपयांची मदत द्या

विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. अन्यथा, हिवाळी अधिवेशनानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

स्व. गोवर्धन शर्मांवर टीका करण्याचा अधिकार नितीन देशमुखांना कोणी दिला? वैशाली शेळकेंचा सवाल

मंत्र्यांची आश्वासने हवेतच!

२० सप्टेंबरला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, २३ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ३० सप्टेंबरला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना अग्रीम मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

अकोला महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत संबंधित प्रकरणे उघडकीस आणण्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, योगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपुते, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, भूषण भिरड, पश्चिम शहरप्रमुख आशिष गावंडे, पूर्व शहरप्रमुख राहुल कराळे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अभय खुमकर, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, संजय भांबेरे आणि किरण अवताडे उपस्थित होते.

 

error: Content is protected !!