व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण नाना पटोले “वर्षा’ वर, थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला!

नाना पटोले “वर्षा’ वर, थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला!

राजकारणात खळबळ; अधिवेशनापूर्वी नव्या राजकीय समीकरणांची चर्चा

 

Mumbai : काँग्रेसचे आक्रमक नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी भाजपवर सातत्याने टीका करणारे पटोले यांनी मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेतल्याने या भेटीमागील नेमके कारण काय, याबाबत राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने तिच्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ ते १८ डिसेंबरदरम्यान होणार आहे. या अधिवेशनाच्या नियोजनासाठी मुंबईत दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाजाच्या नियोजनाबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीसाठी नाना पटोले मुंबईत उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

नाना पटोले हे काँग्रेसमधील आक्रमक आणि सरकारविरोधात ठाम भूमिका मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपच्या धोरणांवर आणि सरकारच्या निर्णयांवर त्यांनी अनेकदा टीका केली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना नवे खाद्य मिळाले आहे. आगामी अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असताना झालेल्या या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ संकटात; महायुती फक्त घोषणाबाजीमध्ये खुश

 

दरम्यान, वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीवरून सुरू झालेल्या चर्चांबाबत नाना पटोले यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आपण मुंबईत आलो होतो. त्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात गैर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील आणि राज्यातील प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे ही लोकशाही व्यवस्थेतील सामान्य प्रक्रिया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना फुटीमागे भाजपची मदत? ठाकरे गटाचा गेम पलटणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भेटीचा संदर्भ देत पटोले यांनी आपण लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे सांगितले आहे. मात्र, अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

पटोले यांच्या स्पष्टीकरणानंतरही या भेटीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही. आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात काँग्रेसची रणनीती काय असेल, विरोधक कोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार आणि या भेटीचा राजकीय संदर्भ काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

____

 

error: Content is protected !!