व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अमरावतीत ‘गोरे विरुद्ध ठाकूर’ राजकीय कलगीतुरा!

अमरावतीत ‘गोरे विरुद्ध ठाकूर’ राजकीय कलगीतुरा!

समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यक्रमावरून आरोप-प्रत्यारोप; दिल्लीतील राजकारणाचा संदर्भ देत गोरे यांचा टोला

Amravati अमरावतीच्या राजकीय वर्तुळात राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगू लागला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमावर टीका करताना यशोमती ठाकूर यांनी तेथे शेतकरीच उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित अभियानाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची अनुपस्थिती असल्याने त्यांनी आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली.

दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी ठाकूर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर निशाणा साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर गावांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे कार्यक्रमाला सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते, अशी भूमिका गोरे यांनी मांडली. या अभियानाच्या माध्यमातून गावांच्या विकासासोबतच दुष्काळमुक्तीसाठीही नियोजन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे ठाकूर यांनी केलेली टीका नाहक असून, ती माहितीच्या अभावातून करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.

बच्चू कडूंचा गटबाजी करणाऱ्यांना सूचक इशारा!

इतक्यावरच न थांबता गोरे यांनी ठाकूर यांना दिल्लीतील राजकारणाचा संदर्भ देत टोला लगावला. यशोमती ठाकूर या दिल्लीतील जंतरमंतरवरील भाषा बोलतात. त्यांचा दिल्लीशी अधिक संपर्क असल्याने गावखेड्यांशी असलेला त्यांचा संपर्क कमी झाला असावा, अशी टिप्पणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यक्रमावरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक शाब्दिक टीकेपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही नेत्यांच्या विधानांमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नव्या संघर्षाची चर्चा सुरू झाली असून, या वादाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

 

error: Content is protected !!