व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण वंचितला भाजपची ‘बी-टीम’ म्हणणाऱ्यांचे पवार-सुळेंवरील मौन का?

वंचितला भाजपची ‘बी-टीम’ म्हणणाऱ्यांचे पवार-सुळेंवरील मौन का?

 

अंजली आंबेडकरांचा पुरोगामी आणि स्त्रीवादी कार्यकर्त्यांना सवाल

Pune : वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे राजकीय भूमिका घेऊन निवडणुका लढवते म्हणून तिला भाजपची ‘बी-टीम’ ठरवणारे टीकाकार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर मात्र मौन का बाळगतात? असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्या आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी तथाकथित पुरोगामी, उच्चवर्णीय स्त्रीवादी आणि ‘निर्भय बनो’शी संबंधित कार्यकर्त्यांच्या राजकीय भूमिकेतील विसंगतीवर निशाणा साधला आहे.

अंजली आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली न जाता स्वतःचे स्वतंत्र राजकारण उभे करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला भाजपची बी-टीम ठरवण्यासाठी काही मंडळी पुढे येतात. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भूमिकांवर प्रश्न उपस्थित करण्याची वेळ येते, तेव्हा याच मंडळींचे आवाज बंद होतात. हा प्रकार राजकीय सोय आणि जातीवर आधारित निवडक संतापाचे उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली.

पालकमंत्रिपदासाठी ताई-दादांची फिल्डिंग!

२०२४ च्या निवडणुकीत प्रबळ जातींचे राजकीय हितसंबंध जपणाऱ्या पक्षांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्यांनी त्या पक्षांच्या भूमिकांवर प्रश्न विचारताना मात्र मौन बाळगल्याचा आरोपही त्यांनी केला. बहुजनांच्या स्वतंत्र राजकीय अस्मितेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते; परंतु भाजपच्या राजकीय भूमिकेला अनुकूल ठरणाऱ्या इतर पक्षांच्या निर्णयांकडे दुर्लक्ष केले जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरही अंजली आंबेडकर यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या प्रक्रियेमुळे उत्तर भारतातील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व तुलनेने वाढण्याची आणि देशाच्या संघराज्यीय समतोलावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. या विषयावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर टीका करणारे खुले पत्र किती स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी लिहिले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

अमरावतीत ‘गोरे विरुद्ध ठाकूर’ राजकीय कलगीतुरा!

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सर्व राज्यांना समान प्रमाणात जागा वाढवण्याची अट घालून तत्त्वतः सकारात्मक भूमिका मांडली होती. मात्र, २३ नोव्हेंबर रोजी त्यांनी विधेयकाचा अंतिम मसुदा पाहिल्यानंतरच पक्षाची स्पष्ट भूमिका जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले होते.

अंजली आंबेडकर यांनी टीकाकारांच्या भूमिकेला बौद्धिक अप्रामाणिकपणा आणि बहुजन राजकीय पक्षांविषयीचा पूर्वग्रह असे संबोधले आहे. भाजपला सातत्याने विरोध करणाऱ्या फुले-आंबेडकरी कार्यकर्त्यांनी या कथित मौनाचा अर्थ संबंधित मंडळी राजकीयदृष्ट्या विकली गेली आहेत, असा घ्यावा का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या पोस्टमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

____

 

error: Content is protected !!