Naksha Abhiyan will facilitate access to land loans : ‘नक्शा’ प्रकल्पाचा शुभारंभ; जमिनींच्या नोंदी अधिक अचूक आणि पारदर्शक होणार
Buldhana केंद्र सरकारने बुलढाणा शहरात ‘नक्शा’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. Department of Land Resources या प्रकल्पाच्या माध्यमातून नगरपरिषद हद्दीतील मिळकतींचे ३डी नकाशे आणि मिळकत पत्रिका तयार करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय व भूमि संसाधन मंत्री शिवराजसिंह चव्हाण, तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातून मंगळवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी कार्यालयात लाईव्ह प्रसारणाद्वारे शुभारंभ करण्यात आला.
या प्रकल्पांतर्गत ड्रोनच्या सहाय्याने नगरपरिषद हद्दीतील भूमापन न झालेल्या जमिनींचे सर्वेक्षण केले जाईल. त्याआधारे मिळकत पत्रिका आणि मालमत्ता पत्रक तयार होणार असून, प्रत्येक मिळकतीच्या सीमा अचूकपणे निश्चित करता येतील. यामुळे नगरपरिषद क्षेत्रातील कर आकारणी, बांधकाम परवानगी आणि अतिक्रमण निर्मूलन अधिक पारदर्शक होणार आहे.
राज्यातील पंढरपूर (सोलापूर), बारामती (पुणे), कुळगाव-बदलापूर (ठाणे), शिर्डी (अहमदनगर), वरणगाव (जळगाव), कन्नड (छ. संभाजीनगर), बुलढाणा, घुग्घुस (चंद्रपूर), खोपोली (रायगड) आणि मुर्तिजापूर (अकोला) येथे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ड्रोन सर्वेक्षणद्वारे नगरपरिषद हद्दीतील मूळ आणि विस्तारित भागांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण व ३डी नकाशे तयार होतील. मिळकत पत्रिका अद्ययावत करण्यात येईल. जीआयएस आधारित प्रणालीद्वारे मिळकत कर नोंदी अद्ययावत करण्यात येतील. नकाश्यांचे सुसूत्रीकरण होईल. नगरपरिषद व भूमि अभिलेख विभागातील उपलब्ध नकाशे एकत्रित करण्यात येतील.
नागरिकांना मिळकत पत्रिकेद्वारे जमिनीच्या हक्कांची खात्री मिळेल. नकाशा व सीमांकन स्पष्ट झाल्यामुळे कायदेशीर वाद कमी होतील. जमिनीवर कर्ज मिळण्यात सुलभता येईल. नगरपरिषदेकडील मिळकतीची माहिती अधिक सुस्पष्ट आणि अचूक होईल. बुलढाणा शहरात हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी भूमि अभिलेख विभाग आणि नगरपरिषदेला निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.