The police tracked down the car stunt performers and registered a case : स्टंटबाजांवरील कारवाईमुळे खळबळ; पालकांनाही तंबी
Nagpur अमरावती मार्गावर रात्रीच्या सुमारास काही तरुणांनी कारने ‘स्टंटबाजी’ केली. त्याची चित्रफीत काढून ‘इंस्टाग्राम’वर टाकली. ती चित्रफीत पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन वाहने जप्त केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून चांगलाच धडा शिकवला. पोलिसांच्या या कारवाईमुळे ‘स्टंटबाजांमध्ये’ एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी रात्री दहा ते बारा युवक पाच कारने फिरायला जात होते. अमरावती मार्गावरून जात असताना त्या कारमधील काही युवक कारच्या छतावर चढले होते. तर काही युवक खिडकीतून बाहेर निघून हुल्लडबाजी करीत होते. कारचालकांनीही सीटबेल्ट लावलेला नव्हता. हा सर्व प्रकार काही युवक भ्रमणध्वनीमध्ये कैद करीत होते. याची चित्रफीत इंस्टाग्रामवर टाकण्यात आली.
ही चित्रफीत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी त्या युवकांवर कारवाई करण्याचे आणि कार जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कारच्या नंबरप्लेटवरून कारच्या मालकाचे नाव आणि पत्ता शोधून काढला व कार जप्त केल्या. त्या सर्व युवकांना वाहतूक उपायुक्त कार्यालयात आणण्यात आले. कारवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर स्टंटबाजांनाही दम देण्यात आला. त्यांच्याकडून भविष्यात अशाप्रकारची धोकादायक ‘स्टंटबाजी’ न करण्याबाबत लिहून घेऊन सूचनापत्र देण्यात आले.
कार चालवणाऱ्या युवकांच्या पालकांनाही पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. मुलांनी केलेल्या ‘स्टंटबाजी’च्या चित्रफिती दाखवण्यात आल्या. यानंतर मुलांच्या हाती कार न देण्यासाठी पालकांना सूचना देण्यात आली. मुलांनी असा प्रकार पुन्हा करू नये म्हणून पोलिसांनी पालकांनाही तंबी दिली. अन्यथा यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.