Drug traffickers in the Nagpur, three MD drug traffickers arrested : पोलिसांचे NO, गुन्हेगारांचे YES; अभियानाची ऐशीतैशी
Nagpur नागपूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून ड्रग्सची तस्करी वाढली आहे. अनेक तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातही नाईटलाईफमुळे वेगळीच संस्कृती नागपुरात जन्माला आली आहे. विशेषतः या संपूर्ण प्रकारात मुलीही मागे नाहीत. ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘उडता नागपूर’ अशी अवस्था झालेली आहे. यात नागपूर पोलिसांच्या Say No to Drugs या अभियानाची ऐशीतैशी झालेली आहे. पोलिसांनी एका कारवाईत तीन एमडी तस्करांना अटक केल्यानंतर या परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
गेल्या एका वर्षांपासून नागपुरात पोलीस आयुक्त ‘ड्रग्स फ्री सीटी’ Drugs Free City अभियान राबवित आहेत. ‘चला एकत्र येऊया, नशामुक्त नागपूर घडवूया’ असा संदेश देत आहेत. मात्र, पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला क्राईम ब्रँच आणि डीबी पथके केराची टोपली दाखवत आहेत. गेल्या आठवड्याभरात पोलीस आयुक्त ‘से नो टू ड्रग्स’ असा संदेश देत आहेत. व्हॉलीबॉल मॅच आणि फुटबॉल मॅच खेळून संदेश देत आहेत. दुसरीकडे मात्र, ड्रग्स तस्करांचा शहरात सुळसुळाट आहे.
Centenary year of RSS : संघाच्या शताब्दी वर्षाचे प्लानिंग कर्नाटकमध्ये!
नशामुक्त अभियान सुरु असतानाच ऑटो रिक्षातून एमडी पावडरची (ड्रग्ज) तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी एमडी पावडरसह एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुर्तजा सलामत अन्सारी (४३, रा. महेंद्रनगर, पाचपावली), मो. सद्दाम मन्सूर मो. शाबीर मन्सूर (१९) आणि मो. वसीम मन्सूर मो. शाबीर मन्सूर (२१, दोन्ही रा. बिहार) अशी ड्रग्ज तस्करांची नावे आहेत.
गेल्या वर्षभरापासून शहरात ड्रग्स विक्रीविरुद्ध पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल हे जनजागृती करीत आहेत. तर दुसरीकडे ड्रग्ज तस्कर काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन लाखो रुपयांचे ड्रग्ज नागपुरात विक्री करीत आहेत, असे बोलले जाते. अनेक ठिकाणी पब, बार आणि हुक्का पार्लरमध्ये एमडी सहजरित्या उपलब्ध होत आहे.
गुन्हे शाखेचे पथक कारवाई करीत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यशोधरानगर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्यांना विटाभट्टी चौक ते ऑटोमोटीव्ह चौक दरम्यान एचसीजी रुग्णालयाजवळ एक रिक्षा संशयितरित्या भरधाव जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन जोरात पळविले.
पाठलाग करत पोलिसांनी ऑटो थांबविला. ऑटोतील मुर्तजा अन्सारी, मो. सद्दाम मन्सूर आणि मो. वसीम मन्सूर या तिघांना ताब्यात घेतले. झडती घेतली असता आॅटो चालकाच्या सीट खाली १६.९५ ग्रॅम एमडी पावडर सापडले. ते पोलिसांनी जप्त केले. कारवाईत पोलिसांनी ड्रग्ज ऑटो, १६ हजारांची रोकड ३ मोबाईल असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करत तिघांनाही अटक केली आहे.