Planning underway ahead of the water shortage crisis; three alternative water sources being considered for Akola : सात दिवसांत पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे निर्देश
Akola मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अकोला शहरासह ग्रामीण भागात भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटाची गंभीर दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकाराने प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी मीना यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत येत्या सात दिवसांत अकोला शहर आणि ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाईचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आतापासूनच नियोजन करून नागरिकांना भविष्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे आमदार सावरकर यांनी बैठकीत स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील पाणीटंचाईची वस्तुस्थिती लक्षात घेऊन पंचायत समित्यांच्या माध्यमातून आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
अकोला शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीत तीन पर्यायी जलस्रोतांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये मोर्णा प्रकल्पातून महान येथील शुद्धीकरण केंद्रापर्यंत पाइपलाइन टाकणे, दगडपारवा येथून महान शुद्धीकरण केंद्रापर्यंत पाइपलाइन उभारणे तसेच वान धरणाची पाइपलाइन उगवा फाट्यापासून अकोला शहरापर्यंत आणणे, या पर्यायांचा समावेश आहे.
या तिन्ही पर्यायांची तांत्रिक व्यवहार्यता तपासून प्राथमिक अंदाजपत्रके तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मीना यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला दिले. त्यामुळे अकोला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी स्रोत उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचालींना वेग येणार आहे.
Uddhav Thackeray Shivsena : कोरडा दुष्काळ जाहीर करा; पश्चिम विदर्भात उद्धवसेनेचे आक्रोश मोर्चे
बैठकीला जिल्हाधिकारी मीना, आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडेकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, एसडीओ जावळे, तहसीलदार झाल्टे तसेच गटविकास अधिकारी मोरे उपस्थित होते.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अकोला शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाणीप्रश्नासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनासोबत समन्वय साधत या उपाययोजनांना गती दिली आहे.






