Congress protests in Gondia for farmers’ loan waiver : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी; राज्यपालांना पाठविले निवेदन
Gondia राज्यातील शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. ४) येथील गांधी प्रतिमा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांना राज्यपालांच्या नावाने निवेदन देण्यात आले.
राज्यातील महायुती सरकारने जनतेला अनेक आश्वासने दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु, आतापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. युवक व बेरोजगारांना रोजगार दिले नाही. तसेच महिलांना दर महिन्याला लाडक्या बहिणीचे वाढीव पैसे दिले नाही.
याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून महायुती सरकारचा निषेध व्यक्त करीत मंगळवारी (दि. ४) गांधी प्रतिमा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनाला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, प्रदेश सचिव अमर वराडे, राजीव ठकरेले, ओबीसी सेल अध्यक्ष जितेंद्र कटरे, जिल्हा उपाध्यक्ष रोशन बडोले, जहीर अहमद, शहर अध्यक्ष ॲड. योगेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारच्या या धोरणाचा निषेध व्यक्त केला.
महायुती सरकारने शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी करावी. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी देणे. शेतकऱ्यांना बोनस तसेच धानाचे चुकारे त्वरित देणे. कृषी पंपावरील लोडशेडिंग बंद करणे. राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार देणे. तलाठ्याच्या परीक्षा घेऊनही त्यांचे आतापर्यंत आदेश दिलेले नाही ते आदेश देणे. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रुपये देणे, अशा मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.
Harshwardhan Sapkal : भाजप म्हणजे ‘मुह में राम आणि बगल में छुरी’!
दरम्यान, उपविभागीय अधिकारी खंडाईत यांना राज्यपालांच्या नावाने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना दिलीप बन्सोड, अमर वराडे, राधेलाल पटले, पुरुषोत्तम कटरे, वंदना काळे, प्रीती रामटेके, विशाखा वासनिक, गोपाल कापसे, राजकुमार पटले, धनलाल ठाकरे, नरेंद्र रहांगडाले, डेमेंद्र रहांगडाले, चित्रा लोखंडे, विमल कटरे, संगीता भगत, ज्योत्स्ना मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








