व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Tukaram Mundhe : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या आवाहनाला तुकाराम मुंढेंचा दुजोरा

Tukaram Mundhe : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या आवाहनाला तुकाराम मुंढेंचा दुजोरा

droupadi-murmu-tukaram-mundhe-celebrity-harmful-product-advertisement-warning : सेलिब्रिटींना स्पष्ट इशारा, प्रभाव म्हणजे कायद्यापासून सूट नव्हे

Mumbai : प्रसिद्ध कलाकार आणि सेलिब्रिटींचा समाजावर, विशेषतः तरुणांवर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करताना त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. गुजरातमधील एकतानगर येथे झालेल्या ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांनी चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना हा संदेश दिला. राष्ट्रपतींच्या या भूमिकेला महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाठिंबा देत सेलिब्रिटींना कायद्याचे पालन करण्याचा स्पष्ट इशारा दिला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लोकप्रिय कलाकारांच्या बोलण्याचा आणि त्यांच्या कृतींचा कोट्यवधी लोकांवर प्रभाव पडतो. विशेषतः तरुण पिढी आपल्या आवडत्या कलाकारांचे अनुकरण करते. त्यामुळे आरोग्यास हानिकारक ठरू शकणाऱ्या पदार्थांचे सेवन किंवा त्यांच्या जाहिरातींना प्रोत्साहन देण्यापासून कलाकारांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. चांगल्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा कलाकारच समाजासाठी सकारात्मक आदर्श ठरतो, असा आशय त्यांच्या वक्तव्यात होता.

Omraje Vs Rana Jagjit Sinha : मुख्यमंत्र्यांच्या गाडीत कट्टर राजकीय विरोधक आमनेसामने !

राष्ट्रपतींच्या या वक्तव्यानंतर तुकाराम मुंढे यांनी त्यांचा संदेश सामाजिक माध्यमावर शेअर करत सेलिब्रिटींच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला. “प्रभाव म्हणजे कायद्यापासून सूट नव्हे, तर जबाबदारी आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. कलाकार इतर नागरिकांप्रमाणेच कायद्याच्या चौकटीत असतात. एखाद्या उत्पादनाचा, सवयीचा किंवा जीवनशैलीचा प्रचार करताना त्यातून समाजावर होणाऱ्या परिणामाचाही विचार करणे आवश्यक असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने काही सेलिब्रिटींच्या जाहिरातींविरोधात केलेली कारवाईही चर्चेत आली आहे. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीत सहभागी झाल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र एफडीएकडून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या जाहिरातीचा संबंध पानमसाल्याच्या सरोगेट जाहिरातीशी असल्याचा एफडीएचा आक्षेप आहे.

Draught relief : खचून जाऊ नका, प्रत्येक बाधिताला मदत करू; मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना शब्द

या प्रकरणात सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेमुळे त्यांना कायदेशीर जबाबदारीतून सूट मिळू शकत नाही, अशी भूमिका मुंढे यांनी यापूर्वीही स्पष्ट केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या नोटिसांना आव्हान देण्यात आले होते; मात्र संबंधित याचिका फेटाळण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचे आवाहन आणि तुकाराम मुंढे यांची भूमिका यामुळे सेलिब्रिटी जाहिराती, ग्राहकांची दिशाभूल आणि सार्वजनिक आरोग्य याबाबतची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. लोकप्रियता जितकी मोठी, तितकी समाजाप्रती जबाबदारीही मोठी असते, हा संदेश या घडामोडींमधून अधोरेखित झाला आहे.

error: Content is protected !!