akola congress may get new city president : नव्या चेहऱ्यांना संधीची अपेक्षा; तरुण नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींचा भर राहणार?
Akola अकोला जिल्हा काँग्रेसला सक्षम आणि प्रभावी नेतृत्व कधी मिळणार, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवूनही पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याने आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांतून जोर धरत आहे. आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण, कार्यक्षम आणि जनतेशी थेट नाळ जोडलेल्या नेतृत्वाला संधी देण्याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) हे पश्चिम विदर्भातील असल्याने या भागातील काँग्रेसच्या संघटनात्मक स्थितीची त्यांना चांगली जाण आहे. अकोला जिल्ह्यातील पक्षाची घसरती ताकद, संघटनात्मक कमकुवतपणा आणि ग्रामीण भागातील कमी होत चाललेला प्रभाव याची त्यांना पूर्ण कल्पना असल्याने नव्या नेतृत्वाच्या निवडीबाबत ते ठोस पाऊल उचलतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला केवळ अकोला पश्चिम मतदारसंघातच मर्यादित यश मिळाले. अकोला पूर्व मतदारसंघात जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांसह अनेक वरिष्ठ नेते वास्तव्यास असतानाही पक्षाला यश मिळू न शकल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात जनाधार असलेल्या आणि संघटन मजबूत करू शकणाऱ्या नेतृत्वाचा शोध सुरू असल्याची चर्चा आहे.
Akash Fundkar : सलग खुनांच्या घटनांनी हादरले अकोला; पालकमंत्री फिरकून बघेना
जिल्हाध्यक्षपदासाठी डॉ. जिशान हुसेन, विजय देशमुख, प्रकाश तायडे, महेश गणगणे, प्रशांत गावंडे आणि डॉ. सुधीर ढोणे यांसारख्या नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत. पक्ष संघटन वैचारिक आणि कार्यात्मक पातळीवर मजबूत करण्यासाठी नव्या नेतृत्वाला संधी मिळावी, अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते करत आहेत.
अपेक्षाभंग ठरलेले जुने प्रयोग
यापूर्वी प्रशासकीय सेवेत यशस्वी ठरलेले अशोक अमानकर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, तर काही विशिष्ट नेत्यांच्या शिफारशीवरून डॉ. प्रशांत वानखडे यांची महानगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र या दोन्ही नियुक्त्यांमधून पक्षाला अपेक्षित राजकीय यश मिळू शकले नाही. त्यामुळे आता संघटनेवर पकड असलेल्या, जनाधार असलेल्या आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद ठेवणाऱ्या नेतृत्वाची निवड व्हावी, अशी अपेक्षा आहे.
Chhagan bhujbal : छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये उतरले !
स्थानिक स्वराज्य संस्थांत यशाची गरज
अकोला जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसला गेल्या काही दशकांत फारसे यश मिळालेले नाही. जिल्हा परिषदेत पक्षाची सदस्यसंख्या पाच-सहा सदस्यांच्या पुढे गेल्याचे चित्र क्वचितच दिसले आहे. दुसरीकडे, सुनील धाबेकर यांच्यासारखे अनुभवी नेते पक्षापासून दूर जात असल्याचे दिसत आहे, तर अनेक कार्यकर्त्यांनी इतर पक्षांचा मार्ग स्वीकारला आहे.
अशा परिस्थितीत अनुभवी आणि नव्या दमाच्या नेतृत्वाचा समन्वय साधत काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचे मोठे आव्हान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर आहे. आता ते अकोला जिल्ह्यासाठी कोणता चेहरा निवडतात, यावर काँग्रेसचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.








