Akola Municipal Corporation : निवडणुकीच्या उंबरठ्यावर शिवसेनेत दुफळी

A split within the Shiv Sena before election : महानगराच्या दोन बैठकांमुळे वाद चव्हाट्यावर

Akola आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महानगरातील पदाधिकाऱ्यांनी दोन स्वतंत्र बैठका घेतल्याने दुफळी प्रकर्षाने समोर आली असून हा वाद आता पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचणार असल्याचे संकेत आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो, अशा परिस्थितीत शिवसेनेतील घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

शिवसेनेत जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर आणि माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया समर्थक असे दोन गट असल्याचे उघड झाले आहे. दोन्ही गटांनी स्वतंत्र बैठकांद्वारे आपापली ताकद आजमावल्याने पक्षात पुन्हा एकदा कुरघोडी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पदाधिकाऱ्यांच्या बैठका डबल झाल्याने हा वाद आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर जाणार असून ते लवकरच संबंधित पदाधिकाऱ्यांची चर्चा घेणार असल्याचे समजते.

Local Body Elections : १२ दिवसांची ‘कसोटी’, मतदान २० डिसेंबरला; प्रचार पुन्हा पेटणार

जून २०२२ च्या फूटीनंतर शिंदे गटाने नवीन कार्यकारिणी जाहीर केली. दोन जिल्हा प्रमुख, एक महानगरप्रमुखसह इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यंदा ग्रामीण भागाकरिता आणखी दोन जिल्हा प्रमुख नेमण्यात आले.

नगर परिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळी अंतर्गत वाद उसळल्याने पक्षावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

अकोला पूर्वमध्ये एकूण ८० पैकी ३२ नगरसेवकांचा समावेश होतो. उर्वरित नगरसेवक अकोला पश्चिममधून निवडून येतात. त्यामुळे निवडणुकीपूर्वी उमेदवारीवरून रेस सुरू होण्यापूर्वीच पूर्व–पश्चिममधील कार्यकर्त्यांमध्ये कुरघोडी वाढली आहे.

Uddhav Balasaheb Thakaeray : शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर गुन्हा दाखल

यातूनच महानगराच्या दोन स्वतंत्र बैठका आयोजित झाल्याची चर्चा आहे. काही पदाधिकारी भाजप नेत्यांशी जवळीक ठेवत आहेत, तर काहींना भाजपकडून प्रतिसाद नाही. त्यामुळे शिंदे गटातच तीन–चार लहान गट निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. भाजपने स्वबळावर लढण्याचा विचार केला तर ‘शिंदे गटात कोणाशी चर्चा करावी?’ असा प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shweta Mahale : चिखलीत ‘संवाद-सलोखा’ रेंगाळला!

मे महिन्यात शिंदे गटाने दोन जिल्हा प्रमुखांची केलेली नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. त्या काळात श्रीरंग पिंजरकर–अश्विन नवले गटाने बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी ‘गोपिकिशन बाजोरिया हटाव–शिवसेना बचाव’ असे घोषवाक्यही दिले होते.

यावेळी बाजोरिया यांची छायाचित्रे असलेले फलक दोन ठिकाणी जाळण्यात आले होते. गत आठवड्यात जिल्हा संपर्क प्रमुख बदलण्यात आले आणि याचवेळी नवीन फलकावरून काही नेत्यांचे फोटो गायब केल्याने नाराजी पुन्हा उफाळून आली.