BJP-NCP Alliance Campaign Starts in Akola : महायुतीच्या उमेदवारांसाठी व्यापक जनसंपर्क
Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आता पूर्ण ताकदीनिशी उडी घेतली आहे. “जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी महायुती सरकारने अनेक योजना राबवल्या असून, अकोला शहराच्या विकासाला गती देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे,” असा सूर भाजपच्या प्रचार मोहिमेतून उमटत आहे.
शहरातील विविध प्रभागांमध्ये आजपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (महायुती) उमेदवारांच्या प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार वैशालीताई शेळके, अनिल गरड, नितीन ताकवले, मंजुषाताई शेळके, अजय रामटेके यांच्यासह इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन संवाद साधला. या मोहिमेत प्रामुख्याने कामगार संघटना आणि स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देण्यात आला.
निवडणूक प्रचारादरम्यान महायुती सरकारच्या काळात झालेल्या कामांचा पाढा वाचला जात आहे. कष्टकरी आणि असंघटित कामगारांसाठी सुरू असलेल्या विमा आणि अर्थसहाय्य योजनांची माहिती नागरिकांना दिली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अकोला शहरासाठी मंजूर झालेला निधी आणि प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन मतदारांना दिले जात आहे.
या प्रचार अभियानात भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सिद्धार्थ शर्मा, कृष्णा शर्मा, संजय जीरापुरे, तुषार भिरड, अमोल गीते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रभागांमध्ये कोपरा सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. केवळ घोषणाबाजीवर न थांबता, थेट मतदारांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन देत ‘कमळ’ आणि ‘घड्याळ’ चिन्हाच्या विजयाचे आवाहन यावेळी करण्यात आले.
अकोल्याच्या राजकारणात सध्या विकासाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असले, तरी भाजपने आपल्या ‘कामगार आणि कष्टकरी’ कार्डाच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती आखली असल्याचे दिसून येत आहे.








