Despite change in reservation, seat stays in the family : आरक्षण बदलले; पण नगरसेवकपद कुटुंबातच आले
Akola राजकारणात आरक्षण बदलले की समीकरणेही बदलतात, असे मानले जाते. मात्र, यंदाच्या अकोला महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी आरक्षण बदलूनही नगरसेवकपद कुटुंबातच कायम राहिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. पतीच्या जागी पत्नी, पत्नीच्या जागी पती, वडिलांच्या जागी मुलगी, तर दिराच्या जागी वहिनी निवडणूक रिंगणात उतरून विजयी ठरल्याची अनेक उदाहरणे यंदाच्या निवडणुकीत समोर आली आहेत.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये वंचित बहुजन नगरसेविका आघाडीच्या माजी नगरसेविका अॅड. धनश्री देव यांच्या निधनानंतर त्यांच्या पती नीलेश देव यांनी जिल्हा परिषदेतील नोकरी सोडून निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यांनी विजय मिळवत पत्नीची जागा कायम राखली. याचप्रमाणे भाजपचे माजी नगरसेवक हरीश काळे यांची जागा आरक्षित झाल्याने त्यांच्या वहिनी शशीकला काळे यांना पक्षाने उमेदवारी दिली. शशीकला काळे यांनी निवडणूक जिंकत दिराची जागा राखली.
BMC Election 2026 : ‘देवेंद्र-रवींद्र’ जोडीने केली कमाल, विरोधकांना केले भुईसपाट
माजी नगरसेवक बबलू जगताप यांनी मुलगी नीतू जगताप हिला रिंगणात उतरवले. नीतू जगताप यांनी विजय मिळवत वडिलांची जागा शाबूत ठेवली. माजी महापौर अर्चना मसने यांची जागा त्यांचे पती व भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने यांनी निवडणूक जिंकून कायम ठेवली. भाजपचे माजी नगरसेवक सुभाष खंडारे यांची जागा विद्या खंडारे यांनी राखली, तर मनपातील भाजप गटनेते राहुल देशमुख यांची जागा निकिता देशमुख यांनी जिंकली आहे.
Devendra Fadnavis BMC Election 2026 : एकनाथ शिंदेंना हवंय महापौरपद? काय म्हणाले शिंदे?
याशिवाय भाजपच्या माजी नगरसेविका आम्रपाली उपरवट यांच्या जागी पती सिद्धार्थ उपरवट, तर मंगला सोनोने यांच्या जागी पती गजानन सोनोने यांनी विजय मिळविला. माजी नगरसेविका जान्हवी डोंगरे यांची जागा पती संतोष डोंगरे यांनी कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे पतीच्या जागी पत्नीची, तर पत्नीच्या जागी पतीची महानगरपालिकेत ‘एन्ट्री’ झाल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी नगरसेवक पंकज गावंडे यांच्या जागेवर पत्नी पूजा गावंडे यांनी विजय मिळवून नगरसेवकपद कुटुंबातच राखले आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका नंदा पाटील यांच्या जागेवर मनोज पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून निवडणूक लढवून ही जागा जिंकली. त्यामुळे आईनंतर मुलाने नगरसेवकपदाची धुरा सांभाळली आहे. एकूणच, अकोला महापालिका निवडणुकीत आरक्षण बदलले असले, तरी अनेक प्रभागांमध्ये सत्तेची सूत्रे कुटुंबातच राहिल्याने ‘घराणेशाही’ची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.








