Mahayuti allots a mere 10 seats to Ajit Pawar’s NCP : अमोल मिटकरी संतापले, महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 10 जागा
Akola अकोला महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला अवघ्या 10 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी महायुतीतील भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “तुमचा मान-सन्मान नको, पण अपमानही कसा सहन करायचा?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
सत्ताधारी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी विदर्भातील चारही महापालिका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत वाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
2017 मध्ये झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत एकूण 80 पैकी भाजपने सर्वाधिक 48 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला 8, तर राष्ट्रवादीला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत भाजपकडे असलेल्या 61 जागा वगळता उर्वरित 19 जागांचे वाटप महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रस्तावानुसार शिवसेना (शिंदे गट) यांना 7 ते 8, तर राष्ट्रवादीला 5 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. एकूण जागावाटपात भाजपला सुमारे 55, शिंदे गटाला 15 आणि राष्ट्रवादीला 10 जागा मिळू शकतात. मात्र, या वाटपावरून आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजप व शिंदे गटावर थेट टीका केली आहे.
Akola Municipal Corporation Elections : आघाडीची चर्चा सुरू असतानाच पाच उमेदवारही जाहीर केले
या संदर्भात अमोल मिटकरी म्हणाले, “तुमचा मान-सन्मान नको देऊ, पण अपमानही सहन कसा करायचा? जर 10-15 जागांवर बोळवण करून राष्ट्रवादीला ग्राह्य धरले जात नसेल, तर अकोल्यात ‘मैत्रीपूर्ण’ ताकद दाखवत प्रेमाने लढावे लागेल. जिल्ह्यातील नेत्यांना काय वाटते, हे वेगळे; पण तळागाळातील कार्यकर्ता आजही जिवंत आहे. माझा पक्ष, माझा स्वाभिमान.” मिटकरींच्या या भूमिकेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अकोल्यातील काही प्रभागांवरून महायुतीत तिढा निर्माण झाला असून, विशेषतः प्रभाग क्रमांक 17 वर भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात चर्चा सुरू आहे. या प्रभागावर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले राजेश मिश्रा यांनी या प्रभागातून जोरदार तयारी केली असून, तो प्रभाग सोडण्यास ते तयार नसल्याचे सांगितले जात आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश मिश्रा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत सुमारे 2500 मते घेतली होती. त्यामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या कारणामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत या वॉर्डात राजेश मिश्रा यांच्यासोबत हातमिळवणी करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. परिणामी, भाजप व शिंदे गटात अंतर्गत वाद वाढताना दिसत आहे.








