Akola Municipal Corporation Elections : काठावरचा विजय ते दणदणीत मुसंडी!

Elections witness an intense fight for dominance : अकोला महापालिका निवडणुकीत रंगले चुरशीचे वर्चस्वयुद्ध

Akola अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा काठावरच्या विजयापासून ते दणदणीत मुसंडी मारणाऱ्या उमेदवारांपर्यंत वैविध्यपूर्ण चित्र पाहायला मिळाले. काही प्रभागांमध्ये मतदारांनी अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत निकालाबाबत उत्सुकता कायम ठेवली, तर काही ठिकाणी उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले राजकीय बळ अधोरेखित केले.

प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले. काँग्रेसच्या अजरा नसरीन मकसूद खान यांनी ९,४९३ मते मिळवत एमआयएमच्या नाजिया अंजुम यांचा तब्बल ७,१०७ मतांनी पराभव केला. याच प्रभागात काँग्रेसचेच उमेदवार अब्दुल सलाम खान यांनी ९,५८५ मते मिळवून एमआयएमचे वसिम खान यांचा ६,१४४ मतांनी दणदणीत पराभव करत विजय संपादन केला. या प्रभागात काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या यशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Amravati Municipal Corporation Election : भाजपला धक्का, युवा स्वाभिमानची मुसंडी!

दुसरीकडे, प्रभाग क्रमांक १४ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जयश्री महेंद्र बहादूरकर यांनी निवडणुकीतील सर्वाधिक मते मिळविण्याचा मान पटकावला. त्यांनी तब्बल ९,९९७ मते घेत भाजपच्या अस्मिता वगारे यांचा ५,६९४ मतांनी पराभव केला. या विजयामुळे वंचित बहुजन आघाडीने शहरातील आपली स्वतंत्र ओळख अधिक ठळकपणे मांडल्याचे चित्र आहे.
मात्र, सर्वाधिक चुरस प्रभाग क्रमांक ७ मध्ये पाहायला मिळाली. येथे महानगर विकास समितीचे चांद चौधरी आणि काँग्रेसचे मो. इरफान अ. रहेमान यांच्यात अटीतटीची लढत झाली. अखेर चांद चौधरी यांनी अवघ्या २७ मतांच्या फरकाने विजय मिळवत काठावरचा निकाल आपल्या बाजूने वळवला. हा निकाल जाहीर होताच प्रभागात तणावपूर्ण शांतता आणि त्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

Akola Municipal Corporation Election : पतीने पत्नीची, मुलीने वडिलांची, तर वहिनीने राखली दिराची जागा!

एकूणच, अकोला महापालिका निवडणुकीत विविध पक्षांना मिळालेले हे यश-अपयश आगामी महापालिका राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार आहे. मोठ्या मताधिक्याने मिळालेले विजय नेतृत्वाला बळ देणारे असले, तरी काठावरचे निकालही राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे पुढील काळात महापालिकेतील सत्तासमीकरणे कशी आकार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.