BJP loses ten seats as Congress delivers an impressive show : भाजप ३८, काँग्रेस २१, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६, वंचित ५
Akola अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला तब्बल दहा जागांचा फटका बसला आहे. दुसरीकडे काँग्रेसने लक्षणीय वाढ नोंदवत आपले संख्याबळ १३ वरून थेट २१ वर नेले असून, ८० जागांच्या सभागृहात काँग्रेस दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
नऊ वर्षांनंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ६२ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ३८ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले. भाजपच्या युतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वाट्याला १४ जागा होत्या; मात्र त्यांना केवळ एका जागेवरच विजय मिळविता आला. भाजपचा स्थानिक मित्रपक्ष असलेल्या महानगर विकास समितीनेही एक जागा जिंकली आहे.
Akola Municipal Election : भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर धारदार शस्त्राने हल्ला
काँग्रेसने ४९ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यापैकी २१ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला १३ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा आठ जागांची भर पडल्याने काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. काँग्रेससोबत आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी २४ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी तीन जागांवर पक्षाला यश मिळाले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तिसरा मोठा पक्ष; वंचितलाही पाच जागा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ५५ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सहा जागांवर विजय मिळवत हा गट तिसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.
Rane and Thackeray : संभाजीराजेंना पकडून देणाऱ्या गद्दार आणि ठाकरे बंधूंमध्ये काहीही फरक नाही !
शिवसेना (शिंदे गट) यांनी सर्वाधिक ६६ जागांवर निवडणूक लढविली होती; मात्र केवळ एका जागेवरच त्यांना यश मिळाले. असे असले तरी राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असल्याने आम्ही भाजपसोबतच राहणार असल्याचे सूतोवाच शिवसेना (शिंदे गट) चे अकोला जिल्ह्यातील नेते, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी लोकमतशी बोलताना केले. त्यामुळे भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसले, तरी मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेची शक्यता कायम आहे.
Akola Municipal Corporation Elections : काठावरचा विजय ते दणदणीत मुसंडी!
एआयएमआयएमने लढविलेल्या ३२ जागांपैकी तीन जागांवर विजय मिळविला असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत या पक्षाचे दोन नगरसेवक अधिक निवडून आले आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासोबत युती करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नऊ जागांवर उमेदवार दिले होते; मात्र एकाही जागेवर मनसेला यश मिळाले नाही.
अकोला महानगरपालिका निवडणूक : अंतिम निकाल
एकूण जागा : ८०
भारतीय जनता पक्ष : ३८
काँग्रेस : २१
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ६
वंचित बहुजन आघाडी : ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ३
एआयएमआयएम : ३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : १
शिवसेना (शिंदे गट) : १
अपक्ष : १
इतर (महानगर विकास समिती) : १








