Newly elected BJP councillor attacked with a sharp weapon : निकालानंतर राजकीय तणाव; वाहनांची ताेडफाेड, आकाेट फैलमधील घटना
Akola महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच शुक्रवारी रात्री शहरातील काही भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २ मधून भारतीय जनता पक्षाचे शरद तुरकर विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण असतानाच याच प्रभागातील भाजपचेच उमेदवार नितीन राऊत यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी तुरकर यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निकालानंतर राजकीय वादाला तोंड फुटले असून, त्याचे पर्यवसान थेट हिंसाचारात झाले.
नितीन राऊत यांच्यासाठी शरद तुरकर यांनी अपेक्षेप्रमाणे मते मागितली नाहीत, त्यामुळेच राऊत यांचा पराभव झाला, असा आरोप करत राऊत यांच्या समर्थकांनी शुक्रवारी रात्री उशिरा तुरकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Rane and Thackeray : संभाजीराजेंना पकडून देणाऱ्या गद्दार आणि ठाकरे बंधूंमध्ये काहीही फरक नाही !
या घटनेदरम्यान तुरकर यांच्या घराशेजारी उभ्या असलेल्या काही वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ला आणि तोडफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी राऊत यांच्या समर्थकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचीही माहिती आहे. सध्या परिसरात शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
निवडणूक निकालानंतर घडलेल्या या घटनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पक्षांतर्गत वाद हिंसक वळणावर जाऊ नयेत, यासाठी सर्वांनी संयम बाळगावा, असे आवाहन केले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अकोट फैल पोलिस करत आहेत.








