Akola Municipal Election : आपसातील हेवेदावे, नेत्यांनी फिरवली पाठ, भाजपेत्तर पक्षांचे देव पाण्यात

Rivalries within anti-BJP camp add to tension : शिंदे आले, इतर नेत्यांची मात्रा पाठ; ठाकरेंच्या आमदारांनी एकट्यानेच लढला किल्ला

Akola महापालिका निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार आज संपत आहे. गेल्या आठ दिवसात भाजप वगळता इतर पक्षांच्या प्रचारातील विस्कळीतपणा, प्रमुख नेत्यांचे अपुरे लक्ष आणि स्थानिक नेत्यांमधील आपसातील हेवेदावे यामुळे महापालिका निवडणुकीत या पक्षांचे देऊळ पाण्यात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

सध्याच्या राजकीय स्थितीत भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस हे दोनच पक्ष दुहेरी आकडा गाठू शकतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे, मात्र ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)मुळे होणाऱ्या मतविभाजनाचा धोका लक्षात घेता काँग्रेसलाही दुहेरी आकडा गाठणे अवघड ठरेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

अकोला महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक ६४ जागांवर उमेदवार दिलेल्या शिवसेनेला (शिंदे गट) प्रचारात मात्र अपेक्षित आघाडी घेता आलेली नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासोबत महायुती न झाल्याने उमेदवार निश्चितीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षात संभ्रमाचे वातावरण होते. काही माजी नगरसेवकांनी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने पक्षाची ताकद कमी झाल्याचे दिसून आले.

Prataprao Jadhav : केंद्रात भाजपसोबत सत्तेत; महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन

शिवसेना उठाबाची स्थितीही फारशी वेगळी राहिली नाही. अनेक प्रभागांतील माजी नगरसेवकांनी पक्ष सोडून इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारत थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरोधात निवडणूक रिंगणात उडी घेतली. दुसरीकडे, काँग्रेसलाही सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यातच ‘एआयएमआयएम’मुळे होणारे मतविभाजन काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरत असल्याची चर्चा आहे.

अकोला महापालिका निवडणुकीत शिवसेनेची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, ते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि इतर नेत्यांमध्येच अंतर्गत मतभेद आणि हेवेदावे उघडपणे दिसून आले. तिकीट वाटपापासून ते प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत या मतभेदांचा परिणाम जाणवत राहिला. परिणामी संपूर्ण प्रचार विस्कळीत झाला. अनेक उमेदवारांना स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित पाठबळ मिळू शकले नाही.

Nitesh Rane : महापौर ‘आय लव्ह महादेव’ म्हणणारा असावा

शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ७ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अकोला शहरात एक जाहीर सभा झाली, मात्र त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत राज्यस्तरावरील कोणताही प्रमुख नेता अकोल्यात प्रचारासाठी फिरकला नाही. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रचार संपण्यास एक दिवस शिल्लक असताना काही सभा घेतल्या. त्याचा परिणाम किती होतो, हे १६ जानेवारी रोजी स्पष्ट होईल.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आमदार नितीन देशमुख यांच्यावरच होती, मात्र राज्यस्तरावरील एकही प्रमुख नेता अकोल्यात प्रचारासाठी न आल्याने पक्षाच्या प्रचाराला मर्यादा आल्या. काँग्रेसकडूनही माजी मंत्री विजय वडेट्टीवार वगळता अन्य कोणत्याही प्रमुख नेत्याची जाहीर सभा झाली नाही. एकीकडे एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अकोल्यात दोन जाहीर सभा घेतल्या असताना, काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांचे प्रचाराकडे झालेले दुर्लक्ष काँग्रेसच्या मतप्रतिशतावर परिणाम करू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.