akola-rto-office-renovation-15-crore-fund-sanctioned : अत्याधुनिक टेस्टिंग ट्रॅकसह इमारतीचा परिसर होणार सुसज्ज; निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
Akola गेल्या काही काळापासून अपूर्ण असलेल्या कामांमुळे चर्चेत असलेले अकोल्यातील नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आता लवकरच पूर्ण क्षमतेने आणि अत्याधुनिक सुविधांसह कार्यान्वित होणार आहे. खडकी परिसरात उभारण्यात आलेल्या या नवीन कार्यालयातील उर्वरित प्रलंबित कामांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच या विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. यामुळे वाहनधारक आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक दर्जेदार व सुलभ होणार आहेत.
अकोला आरटीओच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी, परिसरातील अनेक महत्त्वाची तांत्रिक आणि पायाभूत कामे प्रलंबित होती. यामध्ये प्रामुख्याने वाहन चाचणीसाठी आवश्यक असलेला आधुनिक ‘टेस्टिंग ट्रॅक’, भव्य प्रवेशद्वार, संरक्षक भिंत (कंपाउंड वॉल), अंतर्गत सिमेंट रस्ते आणि लँडस्केपिंगचा समावेश आहे. या कामांअभावी सुसज्ज इमारत असूनही प्रशासकीय कामकाजात आणि नागरिकांना सुविधा पुरवताना अनेक अडचणी येत होत्या. आता मंजूर झालेल्या निधीतून ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत.
Shegaon blackmail case : शेगावमध्ये विद्यार्थिनीला अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत ब्लॅकमेल!
केवळ इमारतीचे सौंदर्यच नव्हे, तर कार्यालयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विद्युतीकरण, नवीन शौचालय ब्लॉक आणि अभ्यागतांसाठी स्पेक्टेटर गॅलरी यांसारख्या सोयीसुविधांवरही भर देण्यात येणार आहे. १५ कोटींच्या या निधीमुळे कार्यालयाचा संपूर्ण परिसर ‘चकाचक’ होणार असून, वाहन परवाना आणि वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. सध्या या कामांसाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
Plastic flowers ban : लग्नसजावटीत प्लास्टिक फुले वापरल्यास डेकोरेटर व हॉलवरही कारवाई!
इमारत पूर्ण होऊनही सोयीसुविधांअभावी अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र, आता प्रस्तावित विकासकामांमुळे अकोल्यात एक सुसज्ज आणि अत्याधुनिक परिवहन कार्यालय उभे राहणार आहे. या आधुनिकीकरणामुळे दलालांचा हस्तक्षेप कमी होण्यास आणि पारदर्शक ऑनलाइन सेवांना बळकटी मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








