Suspicion over works carried out during the ‘administrator rule’ period in the municipal corporation : भाजप-काँग्रेस एकवटले; माजी आयुक्तांच्या कार्यकाळातील कामांवर प्रश्नचिन्ह
Amravati महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना गेल्या चार वर्षांत ‘प्रशासकीय’ कालखंडात विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र येत तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळातील कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
लोकप्रतिनिधींनी २०२३-२४ या वर्षात मोजक्याच ठेकेदारांना प्राधान्य देत नियमबाह्य पद्धतीने देयके काढल्याचा आरोप केला आहे. अनेक प्रभागांत प्रत्यक्ष कामे न होता कागदोपत्री पूर्ण दाखवून बिले काढण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. तसेच पारदर्शक निविदा प्रक्रिया न राबवता विशिष्ट ठेकेदारांनाच कामे देण्यात आल्याची बाबही सभेत मांडण्यात आली.
Anjali damania : ‘सीडीआर’मध्ये संपर्कांचे जाळे, खरातला चाकणकरांचे 177 कॉल
आरोपांचा ‘पॅटर्न’ काय?
कागदोपत्री कामे पूर्ण : प्रत्यक्षात कामे न होता कागदावरच पूर्ण दाखवून बिले काढल्याचा आरोप
ठरावीक ठेकेदारांना लाभ : निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव; मोजक्याच कंत्राटदारांना कामे
निधीचा अपव्यय : तातडीच्या कामांच्या नावाखाली अनावश्यक खर्च केल्याचा संशय
भाजपचे पक्षनेते चेतन गावंडे यांनी, ‘‘प्रशासकीय काळात जनतेच्या पैशांची लूट झाली असून सखोल चौकशी आवश्यक आहे,’’ असे म्हटले.
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी, ‘‘प्रशासनाने मोजक्याच कंत्राटदारांना लाभ देत लोकशाही प्रक्रियेला हरताळ फासला,’’ असा आरोप केला.
Ashok kharat case : भोंदूगिरीचा खेळ की सामूहिक मानसिक गुलामगिरी?
काँग्रेसचे धीरज हिवसे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला, तर मिलिंद चिमोटे यांनी प्रशासकीय काळातील निविदांची तपासणी करण्याची मागणी केली. अनिल अग्रवाल यांनी २०२३-२४ मध्ये मोठा निधी आणण्यात आला असला तरी त्यात टक्केवारीचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी विशेष समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. समितीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि काँग्रेस या विरोधी ध्रुवांच्या पक्षांनी एकाच मुद्द्यावर एकत्र येत आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
NCP Sharad Pawar: नागपुरात राष्ट्रवादीचे ‘कुंटे’ सुटणार? नव्या जिल्हाध्यक्षासाठी ‘तुतारी’ची आरोळी
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी ‘प्रशासकराज’ काळातील कथित भ्रष्टाचाराचे प्रस्ताव महासभेत मांडण्याचा इशारा दिला आहे. येत्या सभेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘‘प्रशासकीय काळात कोणताही गैरव्यवहार किंवा नियमबाह्य कामे झाली असतील, तर त्यावर आमसभेत चर्चा करून महापालिकेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. चुकीचे आढळल्यास कुणालाही वाचवले जाणार नाही,’’ असे भाजपचे पक्षनेते चेतन गावंडे यांनी स्पष्ट केले.








