Ravi Rana and BJP may reunite for the mayoral election : भाजपच्या लता देशमुखांचा महापौरपदासाठी दावा; तर उपमहापौरपदावरून ‘युवा स्वाभिमान’ आणि भाजपमध्ये रस्सीखेच?
Amravati अमरावती महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षाला आता अधिकृतपणे सुरुवात झाली असून, महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने ‘महायुती’मधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टी (वायएसपी) ने रविवारी उमेदवारी अर्ज उचलून आपले पत्ते उघड केले आहेत. विशेष म्हणजे, भाजपने महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही पदांसाठी अर्ज उचलल्याने, उपमहापौरपदावरून मित्रपक्षांमध्ये संघर्ष होणार की समन्वय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप हा अमरावती महापालिकेत २५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपकडून अनुभवी नगरसेविका लता देशमुख यांनी महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही पदांसाठी अर्ज उचलले आहेत. महापौरपद ‘खुल्या प्रवर्गासाठी’ (Open Category) आरक्षित झाल्याने भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने उपमहापौरपदासाठीही अर्ज उचलल्याने, मित्रपक्ष युवा स्वाभिमानला झुकते माप मिळणार की भाजप दोन्ही पदे स्वतःकडे ठेवणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
Free Trade Agreement : भारत–युरोपियन महासंघात आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करार !
दुसरीकडे, १५ जागा जिंकून महापालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीने उपमहापौरपदावर दावा ठोकला आहे. वायएसपीकडून सचिन भेंडे, अजय जैस्वाल आणि प्रशांत वानखडे या तिन्ही प्रमुख चेहऱ्यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज उचलले आहेत. प्रशांत वानखडे यांनी दोन संच घेतल्याने, रवी राणा आपलाच उपमहापौर बसवण्यासाठी भाजपवर दबाव निर्माण करण्याची शक्यता आहे.
८७ सदस्यीय अमरावती महापालिकेत सत्तेसाठी ४४ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. भाजप (२५) + युवा स्वाभिमान (१५) + मित्रपक्ष असे मिळून ४४ हून अधिकचा आकडा महायुतीकडे सहज उपलब्ध आहे. मात्र, उपमहापौरपदाच्या वाटणीवरून जर बिनसले, तर काँग्रेस (१४), एमआयएम (१५) आणि अजित पवार गट (१६) यांच्या हालचाली महत्त्वाच्या ठरतील. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, ३० जानेवारीला सकाळी ११ वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी सुट्टी असल्याने, आता मंगळवारीच (२७ जानेवारी) अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रत्यक्षात किती जण मैदानात उतरतात, यावरून अमरावतीचा नवा ‘कारभारी’ कोण हे स्पष्ट होईल.








