व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अमरावतीच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली

अमरावतीच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली

बंडखोरांना थोपवण्यासाठी पक्षातील नेते पुढे येत नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

Amravati नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. अनिल सोले यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेतल्यानंतर नागपूरमधील बंडखोरीचे नाट्य तूर्तास संपुष्टात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागपूरमधील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या बंडखोरीची चर्चा रंगू लागली आहे. येथे भाजपच्या तीन बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे.

विशेष म्हणजे, या बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अद्याप पुढाकार घेतल्याचे दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

तीनही बंडखोर बड्या नेत्यांचे नातेवाईक, विश्वासू

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या बंडखोरांमध्ये सुमित पवार, चंद्रशेखर भोयर आणि संगीता शिंदे-बोंडे यांचा समावेश आहे. संगीता शिंदे-बोंडे या भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी आहेत. चंद्रशेखर भोयर हे तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे आहेत, तर सुमित पवार हे भाजपचे आमदार चंदू यावलकर यांचे विश्वासू मानले जातात.

या तिन्ही उमेदवारांनी माघार न घेतल्याने भाजपसमोरील पेच वाढला आहे. पक्षातील वजनदार नेत्यांशी जवळचे संबंध असलेल्या या बंडखोरांना थोपवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत नसल्याने या बंडखोरीमागे पक्षांतर्गत राजकारण आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देता, आम्हाला भिकारी समजता का?, तुपकर संतापले

महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक अडचणीत

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळाली आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार किरण सरनाईक हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र, भाजपच्या तीन उमेदवारांनी बंडखोरी कायम ठेवल्याने महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महायुतीचा धर्म पाळण्याऐवजी भाजपमधीलच उमेदवार सरनाईक यांच्यासमोर आव्हान उभे करत असल्याने त्यांच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. परिणामी, या बंडखोरीचा निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मतचोरीच्या आरोपांत अमित झनकांचा संदर्भ

भाजपच्या खासदार-आमदारांचे मौन

अमरावती जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि आमदार यांनी या बंडखोरीच्या मुद्द्यावर अद्याप उघड भूमिका घेतलेली नाही. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी स्थानिक पातळीवरूनही ठोस प्रयत्न होताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालकमंत्र्यांकडूनही या प्रश्नावर सक्रिय हस्तक्षेप झाल्याचे चित्र नाही.

error: Content is protected !!