Responsibility also lies with Dhananjay Munde, Suraj Chavan, Rupali Chakankar. : धनंजय मुंडे, सूरज चव्हाण, रुपाली चाकणकर यांच्यावरही जबाबदारी
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रवक्तेपदावरून हटवले गेलेले आमदार अमोल मिटकरी यांना आता महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये अमोल मिटकरी यांच्यासह माजी मंत्री धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर आणि सूरज चव्हाण यांचाही समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी संघटनेत फेरबदल करत अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटील आणि इतर दोन प्रवक्त्यांना कार्यमुक्त केले होते. त्या वेळी मिटकरी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महायुतीतील पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळेच अजित पवारांनी त्यांना प्रवक्तेपदावरून हटवले, अशी चर्चा रंगली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांतच अजित पवारांनी मिटकरींवर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना स्टार प्रचारकपदाची जबाबदारी दिली आहे.
Ajit Pawar : ‘वर्षा’ बैठकीत अजित पवार संतप्त, सरकारमधून बाहेर पडण्याचीही भाषा !
अजित पवारांच्या नव्या स्टार प्रचारकांच्या यादीत माजी मंत्री धनंजय मुंडे, अभिनेते सयाजी शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, तसेच लातूरमधील मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेले सूरज चव्हाण यांचाही समावेश आहे. मंत्र्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे.
Local Body Elections : भाजपला रोखण्यासाठी शरद पवार गटाची जोरदार तयारी !
अमोल मिटकरी यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “अजित दादांचा कार्यकर्ता असणं हेच माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे. अजित दादांच्या विचाराचा प्रचारक आणि सैनिक म्हणून काम करणे हे माझं भाग्य आहे.” त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या ‘हकालपट्टी’बाबतचं वृत्त फेटाळून लावलं होतं.
दरम्यान, मंत्रीपद सोडल्यामुळे काही काळ शांत असलेल्या धनंजय मुंडे यांनाही पुन्हा पक्षात सक्रिय भूमिका देण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, मात्र आता स्टार प्रचारक म्हणून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या या यादीत एकूण ३० पेक्षा जास्त नेत्यांचा समावेश असून, राज्यभरात पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत अमोल मिटकरी आणि धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाला वेग मिळाला असून, पक्षाच्या अंतर्गत समीकरणांनाही नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
_______








