Anandrao Adsul : दोन वर्षांत दहा राज्यपाल झाले, पण माझा नंबर कधी लागेल?

anandrao-adsul-expresses-disappointment-over-governor-post : आनंदराव अडसूळ यांची खदखद उफाळली, राज्यसभा उमेदवारीवरून शिंदे गटात नाराजी

Mumbai राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा स्फोट झाला आहे. पक्षाने राज्यसभेसाठी अनपेक्षितपणे ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी आपली तीव्र अस्वस्थता उघडपणे व्यक्त केली आहे. “प्रत्येक वेळी केवळ ‘हो’ म्हटले जाते, पण प्रत्यक्षात काहीच मिळत नाही,” अशा शब्दांत अडसूळ यांनी आपल्या भावनांना वाट करून दिल्याने शिंदे गटासमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर आनंदराव अडसूळ यांनी एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ दिली होती. त्यामुळे त्यांना राज्यपालपद किंवा राज्यसभेची संधी मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, वाघमारे यांच्या उमेदवारीने अडसूळ यांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर बोलताना अडसूळ म्हणाले की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेकांनी मला आश्वासने दिली होती. राज्यपाल करणार असे सांगून दोन वर्षे उलटली, या काळात १० राज्यपालांच्या नियुक्त्या झाल्या पण माझा विचार झाला नाही. शेवटी मीच पुढाकार घेऊन राज्यसभेची मागणी केली होती, मात्र तिथेही निराशाच पदरी पडली.”

Mahayuti government : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, जीआर निघाला, मात्र अनुदान निघालेच नाही, भाजपचे आमदारच हतबल

अडसूळ यांनी अत्यंत कडू शब्दात आपली कैफियत मांडली आहे. “माझी मागणी काहीच चुकीची नव्हती. त्यांनी मला काही दिलेले नाही आणि भविष्यात देतील असेही वाटत नाही, हा माझा अनुभव आहे,” असे सांगत त्यांनी नेतृत्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. अडसूळ यांच्यासोबतच गजानन किर्तीकर आणि राहुल शेवाळे यांचीही नावे चर्चेत होती, मात्र पक्षाने सामाजिक समीकरणांचा विचार करत नवीन चेहऱ्याला संधी दिल्याचे समजते.

Katol blast : काटोलमधील स्फोटावर विधानसभेत स्फोटक आरोप-प्रत्यारोप; कंपनी बंद करण्याचे आदेश

दुसरीकडे, ज्योती वाघमारे यांची निवड ही पक्षाची एक रणनीती मानली जात आहे. त्या सुशिक्षित असून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने सक्रिय असतात. नवीन रक्ताला संधी देऊन पक्षविस्तार करण्याचा नेतृत्वाचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, अडसूळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. आता मुख्यमंत्री शिंदे या नाराजीचे व्यवस्थापन कसे करतात आणि अडसूळ यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.