व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Anjali damania : ‘सीडीआर’मध्ये संपर्कांचे जाळे, खरातला चाकणकरांचे 177 कॉल

Anjali damania : ‘सीडीआर’मध्ये संपर्कांचे जाळे, खरातला चाकणकरांचे 177 कॉल

anjali-damania-claims-ashok-kharat-cdr-political-links-maharashtra : अशोक खरात प्रकरणात नवा स्फोट; अंजली दमानियांचा दावा

Mumbai : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ताज्या आरोपांमुळे या प्रकरणाला आणखी मोठे राजकीय आणि प्रशासकीय वळण मिळाले आहे. अशोक खरात याच्या कॉल डिटेल रेकॉर्डची प्रत आपल्या हाती लागल्याचा दावा करत त्यांनी अनेक प्रभावशाली व्यक्तींशी असलेल्या संपर्कांचा उल्लेख केला आहे.

अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या सीडीआरमधील माहिती पोलीस महासंचालक तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली आहे. या नोंदींमध्ये विविध राजकीय नेते, पदाधिकारी आणि इतर व्यक्तींशी झालेल्या संभाषणांची नोंद असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Ashok kharat case : भोंदूगिरीचा खेळ की सामूहिक मानसिक गुलामगिरी?

या आरोपांमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे आहे. त्यांच्या नावावरून अशोक खरात यांना १७७ कॉल्स झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रतिभा चाकणकर यांच्या नावावरून २३६ कॉल्स झाल्याचेही सांगण्यात आले आहे. या संभाषणांचा कालावधीही लक्षणीय असल्याचे नमूद करण्यात आले असून, एका विशिष्ट कालावधीत हजारो सेकंदांचे संभाषण झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.

याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही अशोक खरातला कॉल्स झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार, या कॉल्समध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल्सचा समावेश असून एकूण संभाषणाचा कालावधी साधारण २१ मिनिटांचा असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच इतर काही मंत्र्यांशीही संपर्क झाल्याचे दावे समोर आले आहेत.

NCP Sharad Pawar: नागपुरात राष्ट्रवादीचे ‘कुंटे’ सुटणार? नव्या जिल्हाध्यक्षासाठी ‘तुतारी’ची आरोळी

अंजली दमानिया यांनी सांगितले की, १ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीतल्या कॉल डिटेल्सचा अभ्यास करण्यात आला आहे. या काळात अशोक खरातशी सर्वाधिक वेळ कोणत्या व्यक्तींनी संवाद साधला, याचाही तपशील त्यांनी मांडला आहे. त्यामध्ये तृप्ती खरात यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले असून त्यानंतर रूपाली चाकणकर यांचा क्रमांक लागतो, असा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणात दिपक लोंढे यांच्यासारख्या इतर व्यक्तींचेही मोठ्या प्रमाणावर कॉल्स झाल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय कतार, अमेरिका आणि व्हर्जिन आयलंडसारख्या परदेशातूनही अशोक खरातला कॉल्स आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामुळे या प्रकरणाचा व्याप्ती अधिक व्यापक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

By election : बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार देण्याचा निर्धार

दरम्यान, आर्थिक व्यवहारांच्या तपासातही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत अनेक खात्यांवर अशोक खरात नॉमिनी असल्याचे आढळले असून या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या खात्यांशी संबंधित व्यक्तींची नावे उघड करण्याबाबत पोलीस सध्या संयम बाळगत असल्याचे दिसत आहे.

अंजली दमानिया यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या आरोपांमुळे या प्रकरणातील तपासाचा व्याप्ती वाढण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

अशोक खरात प्रकरण आधीच महिला शोषण, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीमुळे चर्चेत असताना आता त्यात समोर येणाऱ्या या नव्या दाव्यांमुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. तपास यंत्रणा या दाव्यांची पडताळणी करत असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

__

error: Content is protected !!