Internal conflicts in Anjangao congress : पक्षांतर्गत नाराजी वाढली, शहरातील काँग्रेस नेतृत्वाने भाजपला साथ दिल्याचा आरोप
Amravati अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या राजकारणाला नवे वळण मिळाले असून, काँग्रेसच्या काही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. काँग्रेसचे महासचिव मोहम्मद सिद्दीक यांनी पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस नेतृत्वावर भाजपला अप्रत्यक्ष साथ दिल्याचा गंभीर आरोप केला.
नगरपरिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक नऊ नगरसेवक असूनही प्रभावी विरोधकाची भूमिका न बजावता शहराध्यक्षांनी काँग्रेसला भाजपच्या बाजूने उभे केले, असा आरोप सिद्दीक यांनी केला. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली.
नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांच्या विरोधात त्यांच्या सहकाऱ्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून सर्वसाधारण सभा न झाल्याने विकासकामे रखडल्याचा आरोप करत उपनगराध्यक्ष प्रियंका मालठाणे यांच्यासह १७ नगरसेवकांनी २९ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सभा घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगराध्यक्षांनी ७ जुलै रोजी सभेची घोषणा केली. मात्र, सभेच्या आदल्या दिवशी उपनगराध्यक्षांनी ही सभा बेकायदेशीर असल्याचे पत्र दिले असून त्यावर २२ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचा दावा करण्यात आला.
कोरमअभावी सभा रद्द होण्याची शक्यता असताना काँग्रेसच्या नऊपैकी सात नगरसेवकांनी सभेला उपस्थिती लावल्याने कोरम पूर्ण झाला. या भूमिकेमुळे काँग्रेसमध्येच नाराजी निर्माण झाली असून, “अचानक भूमिका का बदलली? यामागे काही आर्थिक व्यवहार झाले का?” असा सवाल मोहम्मद सिद्दीक यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे नगरसेवक आशिक अन्सारी, मो. नजीम ऊर्फ राजा, नगरसेविका आयशा परवीन अकबर शहा, माजी नगरसेवक किस्मत अली, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अकबर शहा तसेच मो. वसीम उपस्थित होते. या घडामोडींमुळे अंजनगाव सुर्जीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली असून, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








