Ashok kharat case : अशोक खरात प्रकरणात प्रशासकीय पडसाद, उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली

ashok-kharat-case-deputy-collector-transfer-sexual-exploitation-fraud-nashik-news : लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार आणि अंधश्रद्धेच्या जाळ्याचे धक्कादायक तपशील उघड

Nashik : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता मोठे राजकीय आणि प्रशासकीय पडसाद उमटवले असून या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाईची सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणत त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याचे आरोप त्यांच्या विरोधात समोर आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

अशोक खरात प्रकरणात आधीच अनेक राजकीय व्यक्तींची नावे समोर आली असून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या खरातशी संबंधित एका ट्रस्टच्या संचालिका असल्याचे समोर आल्याने त्यांच्यावरही चौकशीचे सावट आहे. राज्य सरकारने या प्रकरणात कुणालाही वाचवले जाणार नाही, असा इशारा दिल्यानंतर आता प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू झाल्याने इतर महसूल अधिकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sudhir Mungantiwar : अधिकाऱ्यांची मुजोरी खपवून घेणार नाही! गोंडवाणा विद्यापीठाच्या उपकेंद्रावरून सुधीर मुनगंटीवार संतापले

दरम्यान, अशोक खरातविरोधातील गुन्हे अधिक गंभीर होत चालले असून त्याच्यावर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारींनुसार, तो स्वतःला दैवी शक्ती असलेला व्यक्ती असल्याचे भासवून महिलांना फसवत होता. गुंगीचे पदार्थ देणे, मंत्र-तंत्राच्या नावाखाली मानसिक नियंत्रण मिळवणे आणि भीती दाखवून अत्याचार करणे, अशा पद्धतीने गुन्हे केल्याचे समोर आले आहे. जुलै ते डिसेंबर २०२४ दरम्यान एका तरुणीवर चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून विरोध केल्यास कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याचेही तिने सांगितले आहे.

या प्रकरणात न्यायालयाने अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी उघड होत आहेत. त्याच्या ताब्यातून रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच नरबळी दिल्याचा संशय असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केल्याने खळबळ उडाली आहे.

अशोक खरातने अंधश्रद्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूकही केल्याचे समोर आले आहे. नकली नाग, बनावट खडे आणि तथाकथित ‘एल्विश हनी’ नावाने मध विकून लोकांना लाखोंचा गंडा घातल्याचा आरोप आहे. कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचे सांगत त्याने एक किलो मध तब्बल नऊ लाख रुपयांना विकल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

Land Records : मोजणी वादात शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल; तिघांनी केले विष प्राशन

तसेच त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबाबतही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. स्वतःला अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणून सादर करणारा अशोक खरात प्रत्यक्षात दहावीच्या परीक्षेत गणित विषयात नापास झाला होता. त्याचे मूळ नाव लक्ष्मण एकनाथ खरात असून नंतर त्याने गॅझेटद्वारे नाव बदलून ‘अशोककुमार’ केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सुरू असून राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.